‘जेम्स वेब’ने शोधली सर्वात जुनी आकाशगंगा | पुढारी

‘जेम्स वेब’ने शोधली सर्वात जुनी आकाशगंगा

वॉशिंग्टन :  जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीने कामाला सुरुवात करताच नवे नवे विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. आता या स्पेस टेलिस्कोपने आतापर्यंतची सर्वात जुनी आकाशगंगा शोधली आहे. या आकाशगंगेचे नाव आहे ‘जीएलएएसएस-झेड13’. ही आकाशगंगा ‘बिग बँग’ म्हणजेच महाविस्फोटानंतर केवळ 30 कोटी वर्षांनंतर बनली होती. या ‘बिग बँग’नंतर ब-ह्मांडाची उत्पत्ती झाली असे मानले जाते.
यापूर्वी सर्वात जूनी आकाशगंगा शोधण्याचा विक्रम ‘हबल’ या अंतराळ दुर्बिणीच्या नावावर होता. या दुर्बिणीने 2016 मध्ये ‘जीएन-झेड 11’ आकाशगंगेचा शोध लावला होता. ‘जीएन-झेड 11’ ही आकाशगंगा ‘बिग बँग’ नंतर सुमारे 40 कोटी वर्षांनी बनली होती. ‘जीएलएएसएस-झेड 13’ या आकाशगंगेचा प्रकाश आता अस्पष्ट झाला आहे. या आकाशगंगेचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी 13.4 अब्ज वर्षे लागली. मॅसाच्युसेटस्मधील हार्वर्ड आणि स्मिथसोनियन सेंटर ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या संशोधकांनी या आतापर्यंतच्या सर्वात जुन्या आकाशगंगेला शोधले. हावर्ड सेंटर ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे भारतीय वंशाचे संशोधक रोहन नायडू यांनी सांगितले की आम्ही आतापर्यंतच्या सर्वात दूरवरची आकाशगंगा पाहत आहोत जी आजपर्यंत पाहण्यात आली नव्हती. ‘जीएलएएसएस-झेड 13’ ला टेलिस्कोपच्या मुख्य इन्फ्रारेड इमेजर ‘एनआयआरकॅम’ने टिपले होते. रोहन नायडू यांनी म्हटले आहे की ही आकाशगंगा आपली ग्रहमालिका ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे त्या ‘मिल्की वे’ पेक्षा आकाराने लहान आहे.

Back to top button