लंडन : महासागरांच्या अथांग दुनियेत अनेक अनोखे जीव आढळत असतात. आता अशाच एका जीवाचे छायाचित्र समोर आले आहे. हा जलचर प्रशांत महासागरात आढळला. त्याचे फोटो सोशल मीडियातही आले असून हा अनोखा जलचर पाहून अनेक लोक थक्क झाले.
प्रशांत महासागरात 2994 मीटर खोलीवर हा जलचर आढळून आला. त्याचा फोटो व माहिती ट्विटरवर शेअर करण्यात आली. या ट्विटमध्ये म्हटले आहे की या जलचराला अन्न घेण्यासाठी एक लांब पोलिप असते. तसेच त्याच्या 2 मीटर लांबीच्या स्टॉकपासून 40 सेंटीमीटरचे टेंटीकल्स असतात. या अनोख्या जलचराचा फोटो वेगाने व्हायरलही झाला. अनेकांनी त्याला रिट्विटही केले. समुद्रात यापूर्वी जिथे संशोधन झाले नव्हते अशा 2994 मीटर खोलीवर करण्यात आलेल्या संशोधनावेळी हा अनोखा जलचर आढळून आला.
या जलचराचा उल्लेख 'सीपेन' असा करण्यात आला आहे. जमिनीतून एखादे रोप यावे तसे हे जलचर समुद्रतळाशी समूहात आढळून येतात. मात्र, अशा सीपेनमध्ये हा अनोखा सीपेन आता पाहायला मिळाला आहे. सीपेनच्या 450 प्रजाती आढळतात. त्यापैकी अनेक प्रजाती रंगीबेरंगी असतात.