डासाने पकडून दिला चोर! | पुढारी

डासाने पकडून दिला चोर!

बीजिंगः चोराला पकडण्याबाबतचे अनेक किस्से जगभर ऐकण्यास मिळतात. आता त्यामध्ये आणखी एका किश्श्याची भर पडली आहे. ही घटना चीनमधील असून तिथे चक्क एका डासामुळे चोर पकडला गेला!

चीनच्या फुजियान प्रांतामधील फुजो शहरात असलेल्या एका घरामध्ये चोरी झाली. त्याचा तपास करण्यासाठी पोलिस त्या घराकडे गेले. घराचा दरवाजा बंद होता, त्यामुळे चोर बाल्कनीतून घरात घुसला असावा असा अंदाज पोलिसांनी लावला. घरात किचनमध्ये उकडलेली अंडी, नूडल्स, बेडवर विस्कटलेलं बेडशीट, उशी आढळली. त्यामुळे या घरात चोर काही वेळ राहिला आणि त्यानंतर सामान चोरून पळाला, हे दिसून आले.

तपास करीत असताना पोलिसांना एक मृत डास भिंतीला चिकटलेला दिसला. त्याचे रक्त भिंतीला लागले होते. पोलिसांनी त्या डासातून मिळालेल्या रक्ताची डीएनए चाचणी करण्याचे ठरवले. हे डीएनए एका ‘चाय’ नावाच्या व्यक्तीच्या डीएनएशी जुळत असल्याचे आढळले. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल होते. त्याचा जुना क्रिमिनल रेकॉर्ड होता. 19 दिवसांनंतर त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले व त्यावेळी त्याने संबंधित घरात चोरी केल्याचे कबूल केले.

Back to top button