

नवी दिल्ली : रुग्णालयांमध्ये विविध प्रकारचे पोशाख वापरले जात असतात. त्यामध्ये स्क्रब, गाऊन, डॉक्टर कोट, रुग्णाचा पोशाख आदींचा समावेश होतो. असे पोशाखही स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. त्यामधील सूक्ष्म रोगजंतू आजाराचे कारण बनू शकत असतात. कापडाच्या नरम आणि छिद्रयुक्त पृष्ठभागावर हानिकारक जीवाणू, विषाणू आणि कवक राहण्याचा व त्यांची वाढ होण्याचा धोका असतो. कापडाच्या धुलाईनंतरही हे रोगजंतू कापडला चिकटून राहू शकतात. त्यावर उपाय म्हणून आता आयआयटी दिल्लीतील तज्ज्ञांनी एक नवे सोल्युशन विकसित केले आहे.
आयआयटी दिल्लीच्या इन्क्यूबेटेड स्टार्टअप मेडिकफायबर आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स, नवी दिल्ली) येथील संशोधकांनी हे प्रभावी सोल्यूशन विकसित केले आहे. ते रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णांना रोगजंतुरहित वस्त्र उपलब्ध करून देऊ शकते. रुग्णालयांमध्ये कपड्यांद्वारे फैलावणार्या रोगजंतूंच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
मेडिकफायबरने पोशाख तसेच बेडशीटसारख्या अन्य वस्त्रांची अशी नवी विस्तृत श्रृंखला सादर केली आहे. या वस्त्रांची आणि टेक्स्टाईल मटेरियलची विशेषता अशी आहे की त्यांच्यावर 'व्हायरोक्लॉग' नावाच्या नव्याने विकसित एका खास सोल्युशनचे कोटिंग करण्यात आले आहे, जे रोगजनक सूक्ष्मजंतूंना रोधक आहे. सोल्युशनचे कोटिंग कापडांवर संक्रमण निर्माण करणार्या रोगजंतूंना वाढू देत नाही.
हे सोल्युशन दीर्घकाळ प्रभावी राहते हे विशेष. संक्रमण रोधक सोल्युशनच्या कोटिंगने युक्त अशा कापडापासून बनवलेल्या पोशाख, चादर व बेडशीटमुळे रुग्णालयात विषाणू, जीवाणू व कवकांच्या संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. संशोधकांनी म्हटले आहे की या कापडांवर व्हायरोक्लॉग सोल्युशनचा लेप केल्याने कापडांच्या पृष्ठभागाची ऊर्जा कमी होते. त्यामुळे त्यांना रोगजंतू चिकटून राहू शकत नाहीत.