वर्षातील सर्वात मोठा सुपरमून! | पुढारी

वर्षातील सर्वात मोठा सुपरमून!

नवी दिल्ली : जगभरात बुधवारी रात्री चंद्रबिंब अधिकच सुंदर व मोठे दिसून आले. भारतात सध्या अनेक राज्यांमध्ये पाऊस असल्याने हे चंद्रबिंब पाहता आले नाही. मात्र, दिल्लीसह अनेक ठिकाणी या ‘सुपरमून’चे दर्शन झाले. हा चंद्र नेहमीपेक्षा 15 टक्के अधिक तेजस्वी होता तसेच त्याचा आकारही नेहमीपेक्षा 7 टक्के अधिक होता. हा वर्षातील सर्वात मोठा सुपरमून ठरला आहे.

ज्यावेळी पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर कमी होते, त्यावेळी पौर्णिमेला दिसणारे पूर्ण चंद्रबिंब अधिकच मोठे दिसते. याच घटनेला ‘सुपरमून’ असे म्हटले जाते. गेल्या महिन्याच्या पौर्णिमेलाही सूपरमून दिसला होता. त्यावेळी चंद्र लालसरही दिसून येत होता. मात्र, आषाढ पौर्णिमेला चंद्रबिंब अधिकच मोठे दिसून आले. दिल्ली, हरियाणा, बिहार आणि राजस्थानमध्ये हे चंद्रबिंब पाहता आले. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असताना तो काही वेळा पृथ्वीच्या जवळ येतो. या स्थितीला ‘पेरिजी’ असे म्हटले जाते. तो पृथ्वीपासून दूर गेला की त्याला ‘अपोजी’ असे म्हणतात. खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड नोल यांनी 1979 मध्ये पहिल्यांदाच ‘सुपरमून’ या शब्दाचा वापर केला होता. आता आणखी तीन दिवसही चंद्र पृथ्वीच्या जवळच असणार आहे. यापुढचा ‘सुपरमून’ आपल्याला पुढील वर्षीच्या 3 जुलैला पाहायला मिळेल.

Back to top button