आर्क्टिकमध्ये तापमान वाढतेय चौपट वेगाने | पुढारी

आर्क्टिकमध्ये तापमान वाढतेय चौपट वेगाने

वॉशिंग्टन : जलवायू परिवर्तनाने ध्रुवीय भागातील तापमान वाढत आहे. यामुळे तेथील बर्फाची चादरही वेगाने वितळू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यासंदर्भात संशोधने करण्यात येत आहेत. मात्र, यासंदर्भात नुकत्याच करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार आर्क्टिकचा भाग हा ग्लोबल वॉर्मिंगच्या वेगापेक्षाही चारपटीने जास्त उष्ण होऊ लागला आहे.

‘जियोफिजिकल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि लॉस अलामॉस नॅशनल लॅबोरेटरीचे जलवायू संशोधक पिटर चिलिक यांनी सांगितले की, जलवायू संदर्भातील निष्कर्ष प्रदर्शित करण्यासाठी किमान तीन दशकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मात्र, या संशोधनामध्ये 21 वर्षांच्या काळातील बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे.

दरम्यान, या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी आर्क्टिक भाग व जगातील अन्य भागांतील गेल्या 21 वर्षांमधील तापमानाचे विश्लेषण केले. यामध्ये असे आढळले की, जगातील इतर भागांपेक्षा आर्क्टिकमधील तापमान चारपटीने जास्त वाढले आहे.

ध्रुवीय भागाचे तापमान वाढत असल्याने तेथील बर्फाचा वितळण्याचा वेग वाढत चालला आहे. यामुळे समुद्राची पातळी आणखी वेगाने वाढण्याची शक्यता बळावली आहे. याशिवाय ध्रुवीय भागातील बर्फ वितळल्याने तयार झालेले थंड पाणी उष्णकटिबंधातील पाण्यात मिसळणार आहे. यामुळे आर्क्टिक भागातील पाण्याचे तापमान व उष्णकटिबंधातील पाण्याच्या तापमानातील अंतर कमी होणार आहे. याचा परिणाम सागरी जीवांवरही होण्याची शक्यता आहे.

Back to top button