मासेमारी करताना सापडला दुर्मीळ निळा झिंगा! | पुढारी

मासेमारी करताना सापडला दुर्मीळ निळा झिंगा!

न्यूयॉर्क : कधी कधी मासेमारी करीत असताना अनपेक्षितरीत्या काही अनोख्या वस्तूही हातात येत असतात. आता असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. तिथे एका मच्छीमाराला दुर्मीळ निळा झिंगा सापडला. अत्यंत सुंदर असा हा चमकदार निळा झिंगा पाहून त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना!

पोर्टलँड मेनमध्ये राहणार्‍या लार्स जोहान नावाच्या मच्छीमाराला हे ‘घबाड’ सापडले. नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेलेल्या लार्सला आपल्या जाळ्यात निळा झिंगा सापडणार आहे याची सूतराम कल्पना नव्हती. हा झिंगा अतिशय दुर्मीळ असतो. वीस लाखांमध्ये एक इतका दुर्मीळ! त्यामुळे असा झिंगा आपल्याला सापडला आहे यावर विश्वास ठेवणे त्याला बराच काळ कठीण गेले. ज्यावेळी त्याने स्वतःला चिमटा काढून व साथीदारांना विचारून याबाबतची खात्री केली त्यावेळी त्याचा आनंद गगनाला मावेना! या निळ्या झिंग्याचे छायाचित्र त्याने ट्विटरवरही शेअर केले आहे.

कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की ‘हा निळा झिंगा काल पोर्टलँडच्या किनार्‍यालगत समुद्रात सापडला. तो आणखी मोठा व्हावा आणि वाढावा यासाठी मी त्याला पुन्हा पाण्यात सोडत आहे. ब्लू लॉबस्टर हे वीस लाखांमध्ये एक असतात.’ त्याने शेअर केलेला हा फोटो लगेचच व्हायरलही झाला. लोकांनी त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

Back to top button