‘बर्म्युडा ट्रँगल’मागे मानवी दोष, खराब हवामान! | पुढारी

‘बर्म्युडा ट्रँगल’मागे मानवी दोष, खराब हवामान!

कॅनबेरा : अनेक विमानं, जहाजं गिळंकृत केलेल्या ‘बर्म्युडा ट्रँगल’ या सागरी त्रिकोणी भागाबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत. याठिकाणी अलौकिक शक्ती किंवा गूढ असे काहीही नसल्याचे आता कार्ल क्रुझेलनिकी या ऑस्ट्रेलियन संशोधकाने म्हटले आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने विमानं आणि जहाजं गायब होण्याचे कारण मानवी दोष व खराब हवामान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कार्ल यांनी म्हटले आहे की हा भाग विषुववृत्ताच्या जवळ आहे आणि जगातील संपन्न देश अमेरिकेच्याही जवळ आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असते. जे विमान बेपत्ता झाल्यानंतर बर्म्युडा ट्रँगलबाबत चर्चा सुरू झाली, त्याच्या गायब होण्याबद्दल काही साध्या गोष्टी असू शकतात. ते 5 यूएस नेव्ही टीबीएम एव्हेंजर टॉर्पेडो बॉम्बर्सचे विमान होते. 5 डिसेंबर 1945 रोजी, या फ्लाईटने अटलांटिकवरील फोर्ट लॉडरडेल येथून उड्डाण केले होते.

तळाशी असलेला रेडिओ संपर्क तुटल्याने विमान गायब झाले होते. त्याचा किंवा त्याच्या चौदा क्रू मेंबर्सचा शोध लागला नाही. या विमानांचा शोध घेण्यासाठी आणखी एक पलटण पाठवण्यात आली; पण तीही परत आली नाही. 1964 मध्ये लेखक व्हिन्सेंट गॅडिसने ‘द डेडली बर्म्युडा ट्रँगल’ नावाच्या लेखात आपला सिद्धांत प्रसिद्ध केला त्यावेळी बर्म्युडा ट्रँगलबाबत चर्चा अधिक वाढली.

Back to top button