जनकच म्हणतात, आता मोबाईलचा वापर कमी करा | पुढारी

जनकच म्हणतात, आता मोबाईलचा वापर कमी करा

लंडन : सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. बहुतेक लोक सदानकदा मोबाईलमध्ये डोके घालून बसलेले दिसून येतात. त्यांना सभोवताली काय घडत आहे, याचीही कल्पना नसते. खरे तर मोबाईलचा शोध लावण्याचे श्रेय मार्टिन कूपर यांना जाते. त्यांनी 1973 साली मोबाईलचा शोध लावला. मात्र, ज्या वस्तूचा त्यांनी शोध लावला, त्या मोबाईलचा वापर कमी करा, अशी विनंती मार्टिन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केली आहे; पण ही विनंती त्यांनी का केली आहे? याचे कारण जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दिवसातील बहुतेक वेळ जे लोक मोबाईलवर खर्च करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? असा प्रश्‍न बीबीसीच्या चॅट शोमध्ये मार्टिन कूपर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, लोकांनी मोबाईल बंद करून आपले जीवन थोडे जगावे. कूपर स्वतः दिवसातील 24 तासांपैकी केवळ पाच टक्के वेळ मोबाईलवर घालवतात.

1973 मध्ये मार्टिन कूपर यांनी तयार केलेला मोबाईल आतापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्याची बॅटरी केवळ 25 मिनिटे चालत होती. याशिवाय ती चार्ज करण्यासाठी तब्बल 10 तास लागत असत. याशिवाय त्याचे वजन तब्बल एक किलो 13 ग्रॅम इतके होते. असा हा वजनदार मोबाईल 10 इंच लांब होता. 50 वर्षांनंतर मार्टिन यांना आता असे वाटत आहे की, मोबाईलमुळे लोक आता आपले जीवन जगत नाहीत. ते आपला बहुतेक वेळ मोबाईलवरच घालवतात. या लोकांनी आता मोबाईलचा वापर कमी करून आपल्या मित्रांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा.

Back to top button