सावधान : पृथ्वीच्या दिशेने घोंगावतेय विशालकाय भू-चुंबकीय वादळ | पुढारी

सावधान : पृथ्वीच्या दिशेने घोंगावतेय विशालकाय भू-चुंबकीय वादळ

न्यूयॉर्क : सावधान… एक मोठे भू-चुंबकीय वादळ पृथ्वीच्या दिशेने सरकतेय आणि ते पृथ्वीला धडकू शकते. कारण, तशी शक्यता अमेरिकेतील नॅशनल वेदर सर्व्हिसच्या स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने व्यक्‍त केली आहे. तज्ज्ञांनी व्यक्‍त केलेल्या शक्यतेनुसार येत्या 28 ऑगस्टला सूर्याच्या कक्षेतून काही विशिष्ट चुंबकीय लहरी बाहेर पडू शकतात. या लहरी पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीवर मॅग्‍नेटोस्फिअरची मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

हे वादळ प्रतितास 1609344 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत आहे. ते पृथ्वीवर आल्यानंतर टीव्ही-रेडिओ, मोबाईल फोन आदींच्या संदेशवहनात बाधा निर्माण होऊ शकते. आता भू-चुंबकीय वादळ म्हणजे काय, असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. त्याचे उत्तर आहे सूयार्र्पासून निघणारी किरणे. ही वेगळ्या स्वरूपाची किरणे असून शास्त्रीय परिभाषेत त्याला कोरोनल मास असे संबोधले जाते. ही किरणे पृथ्वीवरील जीवांसाठी अत्यंत धोकादायक आणि हानिकारक ठरू शकतात. प्रामुख्याने या वादळाचा फटका जगभरातील अनेक देशांच्या इंटरनेट सेवेला बसू शकतो. परिणामी, काही काळासाठी जगभरातील इंटरनेट सेवा ठप्प होऊ शकते. एवढेच नव्हे तर याचा परिणाम जगभरातील वीजनिर्मितीवरही होऊ शकतो. अनेक देशात पॉवर ग्रीड काही काळ थबकतील. त्यामुळे संबंधित देशातील काही भाग वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात राहू शकतात.

अभ्यासकांच्या मते, भू-चुंबकीय वादळामुळे समुद्रातून गेलेल्या इंटरनेट केबलवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र, काही अभ्यासकांचे म्हणणे असे की, इंटरनेटच्या फायबर ऑप्टिक्सवर सौर वादळातून निघणार्‍या जिओमॅग्‍नेटिक लहरींचा थेट परिणाम होणार नाही. मात्र, जगभरातील अनेक देशांना जोडणार्‍या समुद्री इंटरनेट केबलला त्याचा मोठा फटका बसू शकतो. ज्या देशांनी या केबल्सना आपल्या ऑप्टिक्ससोबत जोडले आहे असे देश इंटरनेट सेवांपासून काही दिवस बाधित होऊ शकतात. या वादळामुळे उपग्रहीय सेवांवरही परिणाम होऊ शकतो. अर्थातच त्याचा फटका मोबाईल, टीव्ही आदी उपकरणांना बसून प्रसारणात अडथळे येऊ शकतात.

Back to top button