इजिप्‍तमध्ये सापडल्या खुफूच्या काळातील दुर्मीळ कलाकृती | पुढारी

इजिप्‍तमध्ये सापडल्या खुफूच्या काळातील दुर्मीळ कलाकृती

कैरो : इजिप्‍तमधील सर्वात मोठा पिरॅमिड ज्याच्या नावाचा आहे त्या खुफूच्या काळातील दुर्मीळ कलाकृतींचा शोध लावण्यात आला आहे. इजिप्‍त आणि जर्मनीच्या पुरातत्त्व संशोधकांनी एकत्रितपणे हे संशोधन केले आहे. या कलाकृती कैरोच्या ईशान्येकडील ‘सूर्याचे शहर’ म्हटल्या जाणार्‍या प्राचीन हेलियोपोलिसमध्ये सापडल्या आहेत. या कलाकृतींमध्ये अनेक ग्रॅनाईट ब्लॉक समाविष्ट आहेत. या कलाकृती इसवी सनपूर्व 2566 ते इसवी सनपूर्व 2589 काळातील म्हणजेच 4600 वर्षांपूर्वीच्या आहेत.

पुरातत्त्व संशोधक या संशोधनाला अतिशय महत्त्वपूर्ण मानत आहेत. हेलियोपोलिसमध्ये आता प्रथमच खुफूच्या काळातील कलाकृती मिळालेल्या आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की या ब्लॉक साईटचा संबंध एखाद्या अज्ञात इमारतीशी असू शकतो. कदाचित दुसर्‍या शताब्दीच्या अखेरीस गिझाच्या पिरॅमिड क्षेत्रातून या कलाकृती हेलिओपोलिसमध्ये आणलेल्या असाव्यात जेणेकरून इथे एका नव्या इमारतीची उभारणी होईल. प्राचीन इजिप्‍तमधील चौथ्या राजवंशाचा खुफू हा दुसरा फेरो (राजा) होता. सर्वसामान्यपणे असे मानले जाते की खुफूनेच गिझाचा भव्य पिरॅमिड बनवण्याची आज्ञा दिली होती. जगातील सात आश्‍चर्यांमध्ये या पिरॅमिडचा समावेश आहे. या पिरॅमिडच्या अनेक बाबी आजही रहस्यमयच आहेत. खुफूच्या काळातील अन्य इमारती कालौघात नष्ट होऊन गेल्या.

Back to top button