गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा | पुढारी

गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा

फोनों पेन्ह :  पाण्यातीलच नव्हे, तर पृथ्वीवरील सर्वात मोठा जीव म्हणजे निळा देवमासा. असे व्हेल व अन्य मोठ्या आकाराचे मासे खार्‍या पाण्यातच असतात. गोड्या पाण्यातील असा सर्वात मोठा मासा कोणता? याचा शोध सुरू होता. त्यासाठी जैव वैज्ञानिक जेब होगन हे गेल्या सतरा वर्षांपासून प्रयत्न करीत होते. आता त्यांचा शोध पूर्ण झाला आहे. 13 जून रोजी त्यांच्या टीमने एका विशालकाय स्टिंग रे माशाचा शोध घेतला आहे, जो समुद्रात नव्हे तर गोड्या पाण्यात राहतो!

कम्बोडियाच्या मेकांग नदीच्या गढूळ पाण्यातून हा मासा शोधून बाहेर काढण्यात आला व निरीक्षणानंतर पुन्हा पाण्यात सोडण्यात आला. या माशाची लांबी 13 फूट असून, वजन 300 किलो आहे. 2005 मध्ये थायलंडमध्ये पकडलेल्या विशाल कॅटफिशच्या तुलनेत त्याचे वजन 6.8 किलोने अधिक आहे.

डॉ. होगन यांनी सांगितले की, हा गोड्या पाण्यात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा आहे. या प्रजातीचे स्टिंग रे अतिशय धोकादायक असतात. त्यांची शेपूट अतिशय विषारी असते, जी एक फूट लांबीची असू शकते. सर्वसाधारणपणे हा मासा प्रोटिनचा एक मोठा आणि स्वस्त स्रोत म्हणून बाजारात मिळतो.

डॉ. होगन हे दक्षिण आशियातील नद्यांच्या जलीय वैविध्याच्या संरक्षणासाठी कार्य करणार्‍या ‘वंडर्स ऑफ द मेकांग प्रोजेक्ट’चे सदस्य आहेत. त्यामुळे मासेमार्‍यांनी ज्यावेळी हा मासा पकडला त्यावेळी तत्काळ डॉ. होगन यांना कळवले.

Back to top button