43 कोटी वर्षांपूर्वीच्या वणव्याचे मिळाले पुरावे | पुढारी

43 कोटी वर्षांपूर्वीच्या वणव्याचे मिळाले पुरावे

वॉशिंग्टन : अलीकडच्या काळात जगभरातील अनेक जंगलांमध्ये वणव्यांची समस्या वाढली आहे. अमेझॉनच्या किंवा ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमधील वणवे हा जगाच्या चिंतेचा विषय बनला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती व जैवविविधतेची हानी होत असते. अर्थात, वणवे लागणे ही काही नवी गोष्ट आहे असे नाही. कोट्यवधी वर्षांपासून जंगलांमध्ये वणवे लागत आले आहेत. आता 43 कोटी वर्षांपूर्वीच्या भीषण वणव्याचे काही पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. हा वणवा पोलंड आणि वेल्सच्या भागात लागला होता.

अमेरिकेतील कोलबी कॉलेजच्या संशोधकांना पोलंड आणि वेल्समध्ये 43 कोटी वर्षांपूर्वीचे कोळसे आढळले आहेत. ही आग सिलुरियन काळात लागली होती. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, त्या काळात झाडा-झुडपांना उगवण्यासाठी तसेच वाढीसाठी बर्‍याच अंशी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. अतिशय कमी जागेत जमीन किंवा कोरडी ठिकाणे होती. ज्या ठिकाणी आग लागली होती, त्याठिकाणी झाडांऐवजी प्रोटोटेक्साईट्स नावाची विशिष्ट बुरशी असावी. तिची लांबी 9 मीटर म्हणजेच 30 फुटांपर्यंत वाढू शकते. कोलबी कॉलेजचे प्राध्यापक इयान ग्लासपूल यांनी सांगितले, त्या काळात एखाद्या झाडाच्या आकाराच्या बुरशी होत्या, हीच आश्चर्यकारक बाब आहे. त्या काळातील जीवाश्मांच्या अभ्यासावरून ही बाब समोर आली आहे. यापूर्वीचे सर्वात जुन्या आगीचे रेकॉर्ड 33 कोटी वर्षांपूर्वीचे होते. आता त्याच्याही कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या आगीचे हे पुरावे सापडले आहेत.

Back to top button