जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार | पुढारी

जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार

अ‍ॅमस्टरडॅम : पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले भाव तसेच जीवाश्म इंधनांच्या ज्वलनाने होत असलेले प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जगभरातील लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. आता तर सौरऊर्जेपासून बनलेल्या विजेवर चालणारी कार तयार झाली आहे. नेदरलँड्सची कंपनी ‘लाइटइयर’ने जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.

कंपनीचे हे पहिलेच प्रॉडक्ट आहे हे विशेष! ‘लाइटइयर 0’ या नावाने ही सोलर बॅटरी कार सादर करण्यात आली आहे. ती सौरऊर्जेपासून बनलेल्या विद्युत ऊर्जेवर चालेल. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये तब्बल 1 हजार किलोमीटर चालवता येते. तसेच हायवेवर ताशी 110 किलोमीटर वेगाने ही कार चालवल्यास तिची रेंज ताशी 560 किलोमीटर कमी होईल.

ही कार कधी लाँच होणार आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. या ‘लाइटइयर झिरो’ कारची किंमती अडीच लाख युरो म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपये आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, नेक्स्ट इलेक्ट्रिक कारचे बजेट 30 हजार युरो म्हणजेच अंदाजे 27 लाख रुपये असेल. ही एक फॅमिली सेडान कार आहे. या कारमध्ये 5 स्क्‍वेअर मीटरचे सोलर पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने ही कार एका दिवसात 70 किलोमीटरची रेंज देऊ शकते. ही कार बनविण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला, असे कंपनीने म्हटले आहे. यावर्षी नोव्हेंबरपर्यंत ही कार लाँच करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Back to top button