कर्करोगावर आता फोटो इम्युनोथेरपी | पुढारी

कर्करोगावर आता फोटो इम्युनोथेरपी

लंडन :  वैज्ञानिकांनी आता कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारासाठी नवी पद्धत विकसित केल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासाठी फोटो इम्युनोथेरपीमध्ये यश मिळवले आहे. सर्जरी, किमोथेरपी, रेडिओथेरपी आणि इम्युनोथेरपीनंतर कर्करोगावरील ही पाचवी उपचार पद्धत असेल. अन्य थेरपींमधूनही कर्करोगाच्या ज्या छोट्या पेशी निसटून जात होत्या, त्यांचाही या नव्या पद्धतीत खात्मा केला जाईल. या कॅन्सर सेल्स अंधारात चमकतात व त्यामुळे त्यांचा तत्काळ छडा लागतो.

लंडनच्या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी या थेरपीचा उंदरांवर यशस्वी प्रयोग केला. ट्रायल ग्लियोब्लास्टोमा कॅन्सरने ग्रस्त असलेल्या उंदरांवर या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला. ग्लियोब्लास्टोमा हा ब्रेन कॅन्सरमधील सर्वात ‘कॉमन’ प्रकार आहे. फोटो इम्युनोथेरपीत मेंदूतील अतिशय छोट्या कर्करोग पेशीही सहजपणे दिसून आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सहजपणे काढून टाकले. ज्या बाहेर काढता आल्या नाहीत, त्या उपचारानंतर आपोआपच नष्ट होऊन गेल्या.

या ट्रीटमेंटनंतर रुग्णाची इम्युन सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्‍ती अधिक मजबूत होईल. रुग्णामध्ये पुन्हा ग्लियोब्लास्टोमाची लक्षणे दिसताच त्यांना रोखता येईल. या संशोधनामधील डॉ. गॅब्रिएला क्रेमर-मरेकी यांनी सांगितले की, कॅन्सरची अशा प्रकारची ट्रीटमेंट जटिल आहे. मेंदूमध्ये ट्यूमर असल्यास ट्रीटमेंट आणखी आव्हानात्मक बनते. अशावेळी ट्यूमर सेल्सचा छडा लावण्याचे तंत्र मिळणे ऐतिहासिक पाऊल आहे.

उंदरांवरील प्रयोगानंतर आता ग्लियोब्लास्टोमाग्रस्त माणसांवर याबाबतचा प्रयोग करण्यात येणार आहे. तो यशस्वी ठरल्यास अन्य प्रकारच्या कर्करोगांवरही त्याची परीक्षणे केली जातील. संशोधक सध्या न्यूरोब्लास्टोमा कॅन्सरवरील उपचारासाठीही संशोधन करीत आहेत.

Back to top button