पृथ्वीवरील उल्केने उलगडले मंगळाचे रहस्य | पुढारी

पृथ्वीवरील उल्केने उलगडले मंगळाचे रहस्य

लंडन :  आपल्या ग्रहमालिकेतील ग्रहांपैकी शेजारीच असलेला मंगळ ग्रह नेहमीच माणसाला खुणावत राहिलेला आहे. पृथ्वीसारखाच ठोस पृष्ठभाग असलेल्या या लाल ग्रहाबाबत सातत्याने नवे संशोधन होत असते. मंगळावर अनेक ऑर्बिटर, रोव्हर, रॉटरक्राफ्ट पाठवलेले असले तरी पृथ्वीवरही त्याबाबत वेगवेगळे संशोधन होते. मंगळ ग्रह कसा बनला याबाबत अनेक सिद्धांत आहेत. मात्र, पृथ्वीवर 200 वर्षांपूर्वी पडलेल्या एका उल्केने त्याचे रहस्य उलगडण्यास मदत केली आहे.

मंगळ ग्रहाच्या अंतर्गत भागांबाबतची माहिती अंतराळातून पृथ्वीवर आलेल्या तीन शिळांनी दिली आहे. एका अवकाशीय धडकेनंतर या शिळा मंगळापासून वेगळ्या होऊन पृथ्वीवर कोसळल्या होत्या. त्यामध्येच ‘चेसिंगी’ उल्केचा समावेश आहे. ही उल्का सन 1815 मध्ये ईशान्य फ्रान्समध्ये कोसळली होती. दोन अन्य उल्कांची नावे ‘शेरगोटी’ व ‘नखला’ अशी आहेत. चेसिंगी उल्केच्या नव्या विश्‍लेषणातून असे दिसून आले की मंगळाची अंतर्गत रासायनिक रचना ही त्याची लघुग्रहांशी झालेल्या धडकेतून बनलेली आहे. यापूर्वी असे म्हटले जात होते की मंगळाचा ‘केमिकल मेकअप’ हा वायूंचा विशाल गोळा असलेल्या ‘नेब्यूला’पासून आलेला आहे.

पृथ्वी व मंगळासारख्या खडकाळ पृष्ठभागाच्या ग्रहांवर हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन यासारखे वायू कुठून आले याबाबतच्या जुन्या सिद्धांतालाही नव्या संशोधनाने छेद गेला आहे. सौरमंडळाच्या जन्मानंतर सुमारे 40 लाख वर्षांनीच मंगळ ठोस ग्रह बनलेला असल्याने वैज्ञानिकांना त्याबाबत कुतुहल वाटते. पृथ्वीला ठोस बनण्यासाठी 5 ते 10 कोटी वर्षे लागली होती. नव्या सिद्धांतानुसार मंगळाला अनेक लघुग्रह व अन्य खगोल धडकले होते. त्यामुळे त्याच्यावर अनेक रसायने पोहोचली.

Back to top button