टोकियो : मंगळावरील जीवसृष्टीबाबतचे कोडे त्याचा सर्वात मोठा चंद्र 'फोबोस' मुळे सुटेल असे काही खगोल शास्त्रज्ञांना वाटते. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (जाक्सा) च्या संशोधकांनी म्हटले आहे की 'फोबोस'वर एके काळी सूक्ष्म जीवांचे अस्तित्व असावे.
अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाला लघुग्रहाची धडक झाली होती. त्यामुळे 'फोबोस'वर सूक्ष्म जीवांची निर्मिती झाली असावी असे या संशोधकांना वाटते. डॉ. रुकी हैदो यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की फोबोस या चंद्राचे मंगळापासून असलेले स्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा चंद्र मंगळाभोवती अतिशय जवळच्या कक्षेतून फिरतो. त्या तुलनेत पृथ्वीचा चंद्र दूरवर आहे.
मंगळ आणि फोबोसमधील जवळचे अंतर लक्षात घेतले तर असे दिसून येते की जर मंगळावर जीवसृष्टी असेल तर फोबोसवर तिचा प्रसार होणे सहजशक्य आहे. जपानी संशोधकांनी यासाठी 2024 मध्ये 'मार्शियन मून्स एक्सप्लोरेशन' ही मोहीम आखली आहे. त्यावेळी फोबोसवरील नमुने गोळा करून त्यांचा याबाबत अभ्यास करण्यात येईल.