महिलांमध्ये मायग्रेनची समस्या पुरुषांपेक्षा तिप्पट | पुढारी

महिलांमध्ये मायग्रेनची समस्या पुरुषांपेक्षा तिप्पट

न्यूयॉर्क : मायग्रेन हा डोकेदुखीचा विकार अनेकांना असतो. एका अनुमानानुसार 100 कोटींपेक्षाही अधिक लोक म्हणजे दर सातपैकी एक व्यक्ती मायग्रेनने त्रस्त आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना ही समस्या तिप्पटीने अधिक असते. मायग्रेनग्रस्त दर दहापैकी 8 व्यक्ती महिलाच असतात. महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोनमध्ये होणार्‍या बदलांमुळे त्यांना मायग्रेनचा त्रास अधिक असतो.

मायग्रेनग्रस्त दहापैकी नऊ रुग्णांची दिनचर्या या समस्येमुळे अत्यंत प्रभावित झालेली असते व ही चिंताजनक बाब आहे. डोकेदुखीमुळे ते कोणतेही काम करू शकत नाहीत. काही लोकांना मायग्रेनच्या वेदना सुरू होण्यापूर्वी एक ते दोन दिवस आधी बद्धकोष्ठता, मानेत वेदना, मूड वेगाने बदलत राहणे, सतत लघुशंकेस जाणे, जांभई, डोळ्यांपुढे अंधारी येणे, बोलत असताना अडखळणे, हाता-पायात सुई टोचल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. या लक्षणांना ओळखून आधीच वेदनेवर उपचार करता येऊ शकतात.

हा एक असा आजार आहे जो मेंदू किंवा चेतातंतूला प्रभावित करतो. अनेक प्रकारची डोकेदुखी, उलटी, नाकातून पाणी येणे, आवाज व प्रकाशाचा त्रास होणे अशा समस्या जाणवतात. मायग्रेन बहुतांशी ‘क्रोनिक’ आजार असतो, म्हणजे तो एकदा सुरू झाला की ही समस्या अनेक वर्षे राहू शकते. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये मायग्रेनची कारणे वेगळी असू शकतात. मात्र, काही सामान्य कारणांना ‘ट्रिगर’ म्हटले जाते. प्रखर प्रकाश, हवामानात बदल, दिनचर्येत बदल, भोजनात बदल, डिहायड्रेशन, तीव— गंध किंवा हार्मोनल बदलामुळेही ही समस्या उद्भवते. थंड पाण्याची आंघोळ, प्राणायाम, ध्यान अशा काही गोष्टींमुळे ही समस्या कमी होऊ शकते.

Back to top button