लस घेण्यासाठी वीस वर्षांनंतर गुहेबाहेर आला माणूस! | पुढारी

लस घेण्यासाठी वीस वर्षांनंतर गुहेबाहेर आला माणूस!

बेलग्रेड : कोरोनावर मात करण्यासाठी वेगवान लसीकरण हाच रामबाण उपाय आहे. मात्र, अद्यापही काही लोक लस घेण्यास कचरत असताना दिसून येतात. आता अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी एक घटना घडली आहे.

सर्बियामधील डोंगराळ भागातील एका गुहेत राहणारा माणूस खास लस घेण्यासाठी वीस वर्षांनंतर गुहेबाहेर आला! त्याने कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आणि पुन्हा आपल्या गुहेत गेला.

सत्तर वर्षे वयाचे पेंटा पर्ट्रोविक गेल्या दोन दशकांपासून मानवी वसाहतींपासून दूर एका छोट्याशा गुहेतच राहत आहेत. इतक्या वर्षांनंतर आता ते प्रथमच लस घेण्यासाठी म्हणून गुहेबाहेर आले आहेत. अर्थातच गुहेत राहूनही त्यांना जगात काय घडत आहे हे वेगवेगळ्या मार्गाने समजत असते. एकेकाळी पेंटा यांनी मजूर म्हणून काम केले होते. त्यांनी गेल्या शुक्रवारी लसीचा पहिला डोस घेतला.

यावेळी त्यांनी सर्व लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी असे आवाहनही केले. त्यांनी सांगितले, लोक लस घेण्यासाठी का कचरतात हेच मला कळत नाही. सर्वांनी पुढे यावे व स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षेसाठी लस घ्यावी! पेंटा एका गुहेत राहत असले तरी त्यांच्या वन्य मित्रांची यादी मोठी आहे. ‘मारा’ असे त्यांनी नाव दिलेल्या एका डुक्कराशी तर त्यांची खासच दोस्ती आहे.

बकर्‍या, कोंबड्याही त्यांनी पाळलेल्या आहेत. त्यांना माणसांच्या जगात येणे फारसे आवडत नाही. मात्र, कोरोना महामारीच्या काळात लस घेण्यासाठी ते आवर्जुन आपल्या गुहेतून बाहेर पडले!

Back to top button