पंचविशीतच बनला अब्जाधीश उद्योजक! | पुढारी

पंचविशीतच बनला अब्जाधीश उद्योजक!

वॉशिंग्टन : बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, रिचर्ड ब—ान्सन, मार्क झुकेरबर्ग ही नावं अशी आहेत ज्यांनी अगदी तरुण वयातच आपले कौशल्य जगाला दाखवून बड्या कंपन्यांची पायाभरणी केली होती. आता ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने अमेरिकेतील अलेक्झांडर वांग याला ‘जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश’ घोषित केले आहे. आशियाई वंशाचा अलेक्झांडर ऐन पंचविशीतच अब्जाधीश झाला आहे. सहा वर्षांतच त्याच्या कंपनीचे मूल्य 56,210 कोटी रुपये झाले असून वांगची हिस्सेदारी 15 टक्के आहे जी सुमारे 7700 कोटी रुपयांइतकी आहे.

अलेक्झांडरला लहानपणापासूनच गणित विषयात रस होता. त्यामुळे सहावीत असल्यापासूनच तो राष्ट्रीय गणित आणि कोडिंग स्पर्धेत सहभागी होत असे. त्यामागे त्याचा हेतू डिस्ने वर्ल्डचे तिकिट मोफत मिळवणे हा असे! स्पर्धेत त्याला कधी यश मिळाले नाही; पण कोडिंगमध्ये रस निर्माण झाला. वयाच्या 17 व्या वर्षी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ‘क्वोरा’ या वेबसाईटसाठी त्याने पूर्णवेळ कोडिंग सुरू केले. मशिन लर्निंग शिकण्यासाठी त्याने मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला.

मात्र, एकच वर्ष शिक्षण घेतल्यावर त्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत ल्युसी ग्युओसोबत ‘स्कॅल एआय’ कंपनी सुरू केली. शिक्षण असे मध्येच सोडून कंपनी सुरू करण्याचा त्याचा निर्णय अर्थातच त्याच्या आई-वडिलांना पसंत नव्हता. त्यामुळे ‘कॉलेज सुरू होताच मी हे काम बंद करीन’ असे त्याने आई-वडिलांना सांगितले होते, मात्र तसे घडले नाही. वांगच्या कंपनीला फंडिंग मिळाले आणि सुरुवातीलाच चांगले यश मिळाल्याने आई-वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले. ‘फॉर्च्युन’ नुसार वांगची कंपनी अमेरिकेचे हवाई दल, लष्कर, जनरल मोटर्ससह 300 पेक्षा अधिक कंपन्यांना त्यांच्या डेटाचे विश्लेषण करून देते.

Back to top button