वाढत्या तापमानामुळे घटली 44 तासांची झोप | पुढारी

वाढत्या तापमानामुळे घटली 44 तासांची झोप

कोपेनहेगन : वाढत्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम सध्या प्रत्येक क्षेत्रावर होताना दिसत आहे. यातून माणसाची झोपही सुटेनाशी झाली आहे. ‘वाढते तापमान आणि माणसाची झोप’ यावर आधारित नुकतेच एक संशोधन करण्यात आले. या संशोधनातील दाव्यानुसार वाढत्या तापमानामुळे सरासरी एक व्यक्‍ती प्रत्येक वर्षाला 44 तासांची झोप गमावत आहे.

डेन्मार्कमधील ‘कोपेनहेगन युनिव्हर्सिटी’च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनामध्ये 68 देशांचे 47 हजार लोक सहभागी झाले होते. शास्त्रज्ञांनी ‘रिस्ट बँड’च्या मदतीने सहभागी लोकांची एकूण 70 लाख रात्रींची झोप ट्रॅक केली. यानंतर या आकडेवारीचे विश्‍लेषण केले. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीचे तापमान जसे वाढत आहे, तसे झोपेचे काही क्षणही आम्ही गमावत आहोत.

शास्त्रज्ञांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ‘स्लीप लॉस’चे प्रमाण एक चतुर्थांश जास्त आहे. याबरोबर 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये हे प्रमाण दुप्पट आहे. याशिवाय कमी उत्पन्‍न असणार्‍या देशांमधील लोकांचे स्लीप लॉसचे प्रमाण तब्बल तिप्पट आहे. दरम्यान, यापूवीच्या संशोधनात हवामानातील बदल आणि मेंटल हेल्थ, हार्ट अ‍ॅटॅक, आत्महत्या आणि अपघात यावर प्रकाश टाकण्यात आला होता. डेन्मार्कच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार पुरुषांच्या तुलनेत रात्रीच्या सुमारास महिलांचे शरीर लवकर थंड होते. यामुळे रात्रीच्या सुमारास तापमान जास्त असेल तर त्यावेळी महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रभावित होतात.

हेही वाचलंत का?

Back to top button