सात वर्षांपूर्वीच चीनमध्ये झाले होते कोरोनाचे संक्रमण? | पुढारी

सात वर्षांपूर्वीच चीनमध्ये झाले होते कोरोनाचे संक्रमण?

न्यूयॉर्क : पुढारी वृत्तसेवा

सध्या कोरोना महामारीने संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. या विषाणूने आतापर्यंत जगभरात 2 कोटी 17 लाखांपेक्षा अधिक लोक संक्रमित झाले असून 7 लाख 72 हजारांपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचे संकट जगावर येऊन आता आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ गेला आहे. मात्र, अद्याप या विषाणूच्या उत्पत्तीबाबत निश्‍चित माहिती समजू शकलेली नाही. आता दोन अमेरिकन संशोधकांनी असे म्हटले आहे की सात वर्षांपूर्वीच कोरोनाने चीनमध्ये आपले अस्तित्व दाखवले होते. 2012 मध्ये खाणकाम करणार्‍या काही मजुरांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. मात्र, वुहानमधील फैलावानंतर 2019 मध्ये या विषाणूची चर्चा जगभर सुरू झाली.

कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर याबाबत अनेक उलटसुलट मते व्यक्‍त करण्यात आली. चीनच्या वुहानमधील सीफूड मार्केटमधून हा विषाणू फैलावला असे म्हटले गेले तर वुहानच्याच एका प्रयोगशाळेत त्याची निर्मिती झाली व तेथूनच हा फैलावला असेही म्हटले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर आता हा नवाच आश्‍चर्यकारक दावा करण्यात आला आहे. याबाबतची माहिती चिनी डॉक्टर ली जू यांच्या मास्टर्स थीसिसचा भाग आहे. या थीसिसचा अनुवाद आणि अध्ययन डॉ. जॉनथन लाथम व डॉ. एलिसन विल्सन यांनी केले आहे. या संशोधकांच्या मते, 2012 मध्ये चीनच्या नैऋत्येकडील युनान प्रांतातील मोजियांग खाणीत सहा मजुरांना वटवाघळांची विष्ठा हटवण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी चौदा दिवस या खाणीत काढले व नंतर त्यांच्यामध्ये तीव्र ताप, कोरडा खोकला, हाता-पायांमध्ये वेदना आणि डोकेदुखी अशी लक्षणे दिसू लागली. त्यापैकी तीन मजुरांचा मृत्यूही झाला. या मजुरांचे स्वॅब वुहानमधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तेथूनच हा विषाणू लीक झाला असावा असा संशोधकांचा दावा आहे. एका अहवालानुसार वुहानमध्ये ‘कोविड-19’ मुळे मृत्यूची पहिली घटना 11 जानेवारी 2020 मध्ये घडली. त्यानंतर अवघ्या नऊ दिवसांमध्ये हा विषाणू चीनमधून जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंडपर्यंत जाऊन पोहोचला. सध्या हा विषाणू जगभरातील 180 देशांमध्ये पोहोचलेला आहे.

Back to top button