

वॉशिंग्टन : एकाच वेळी दोन बाळांना जन्म दिला आहे; पण ही बाळं जुळी नाहीत असे म्हटल्यावर आपल्याला साहजिकच आश्चर्य वाटू शकते. मात्र, निसर्गाचे नियम कधी कधी असे अपवादानेही सिद्ध होऊ शकतात. एकदा गर्भधारणा झाल्यावर नवे स्त्रीबीज तयार होणे किंवा ते फलित होणे हे अत्यंत दुर्मीळ असते. मात्र, अमेरिकेतील एका महिलेबाबत असे घडले. ती गर्भवती असतानाच पाच दिवसांनी पुन्हा तिला गर्भधारणा झाली व या दोन गोंडस मुलांचा जन्म झाला.
कॅलिफोर्नियातील 25 वर्षांच्या कारा विनहोल्ड या महिलेबाबत असे घडले आहे. वैद्यकीय भाषेत याला 'सुपरफिटेशन' असे म्हटले जाते. असा मासे, ससे आदींच्या बाबतीत वारंवार घडत असते; पण क्वचितच मानवाबाबत घडते. ज्यावेळी आईच्या गर्भात एक फलित झालेले स्त्रीबीज वाढत असते त्याचवेळी आणखी एक स्त्रीबीज तयार होऊन ते फलित झाल्यास त्याला 'सुपरफिटेशन' असे म्हणतात. ही एक अत्यंत दुर्मीळ अशी स्थिती आहे. या दोन्ही भ—ूणांचा विकास वेगवेगळा होत असतो. त्यामुळे एखादे भ—ूण पूर्ण विकसित होते, त्यावेळी दुसरे भू्रण कमी विकसित झालेले असू शकते.
अशावेळी वारंवार अल्ट्रासाऊंड चाचण्या करून बाळ कुपोषित आहे का, हे पाहावे लागते. दोन्ही भ—ूणांचा आकार आणि वयात फरक राहू शकतो. मात्र, काराची ही दोन्ही मुलं जुळीच वाटावीत इतक्या वयाची व आकाराची आहेत. दोघांचे चेहरेही सारखेच असल्याने अनेकांना ती जुळीच असल्यासारखे वाटते. या मुलांच्या जन्माने ती व तिचा पती ब्लेक यांचा आनंद अक्षरशःद्विगुणित झालेला आहे! त्यांना आधीचा एक मुलगा असून आता त्यांना आपले कुटुंब पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.