Japan Earthquake | ...अन्‌ अख्खा जपान पूर्वेकडे सरकला

2011 Japan Earthquake |
2011 Japan Earthquake | ...अन्‌ अख्खा जपान पूर्वेकडे सरकला
Published on
Updated on

टोकिओ : २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर एक अत्यंत धक्कादायक आणि अनोखी भौगोलिक घटना घडल्याचे संशोधकांनी शोधून काढले आहे. ११ मार्च २०११ रोजी झालेल्या ९.० रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपानंतर अवघ्या १५ मिनिटांत जपानचा बहुतांश भूभाग पूर्वेकडे सरकला होता. 'युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो'च्या भूगर्भशास्त्रज्ञ सुनयांग पार्क यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून हा महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. संशोधनानुसार, या भूकंपाच्या वेळी निर्माण झालेल्या ऊर्जा लहरी थेट पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत खाली गेल्या आणि तेथून परावर्तित होऊन पुन्हा भूपृष्ठाकडे आल्या. या लहरींमुळे जपानमधील चार प्रमुख भूपट्टे विस्थापित झाले. यामुळे होक्काइडोपासून क्युशूपर्यंतचा सुमारे ३,००० किलोमीटरचा मुख्य भूभाग ५ ते ६ मिलिमीटरने पूर्वेकडे सरकला. विशेष म्हणजे, ही हालचाल संपूर्ण जपानमध्ये एकाच वेळी अत्यंत एकसमान पद्धतीने झाली.

भूकंपशास्त्रातील एक नवा धोका

शास्त्रज्ञांच्या मते, ही घटना एका ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाएवढीच ऊर्जा निर्माण करणारी होती. मात्र, ही ऊर्जा खूप मोठ्या क्षेत्रावर पसरल्यामुळे तिची तीव्रता कमी जाणवली आणि त्यामुळे थेट नुकसान झाले नाही. याआधी शास्त्रज्ञांचा असा समज होता की, पृथ्वीच्या गाभ्यावरून परावर्तित होणाऱ्या लहरींची ऊर्जा भूपृष्ठापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट होते. परंतु, या नव्या शोधामुळे आता भूकंप धोक्यांचे मूल्यांकन करताना या नव्या घटकाचाही विचार करावा लागणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा शोध

अशा प्रकारच्या लहरींना पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत जाऊन परत येण्यासाठी साधारण १५ मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे भविष्यात अशा घटनांचा अंदाज बांधणे आणि पूर्वतयारी करणे शक्य होऊ शकते, असा विश्वास शास्त्रज्ञ पार्क यांनी व्यक्त केला आहे. जपानमधील प्रगत उपग्रह आणि भूकंप मापन यंत्रणेमुळेच या अत्यंत सूक्ष्म परंतु ऐतिहासिक हालचालीची नोंद घेणे शक्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news