वॉशिंग्टन : माणूस जिथे जिथे गेला तिथे त्याने कचरा निर्माण करून ठेवला. एव्हरेस्टसारख्या उत्तुंग पर्वतशिखरापासून ते महासागरांच्या खोलीपर्यंत, ध्रुवीय प्रदेशांपासून ते अंतराळापर्यंत अनेक ठिकाणी मानवनिर्मित कचरा पाहायला मिळतो. अगदी चंद्रही याला अपवाद नाही! 'अपोलो-11' मोहिमेत मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल पडले. त्यानंतर अनेक 'अपोलो' मोहिमा झाल्या व त्यामधून अनेक अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. या मोहिमांमुळे तसेच नंतरच्याही अनेक चांद्रमोहिमांमुळे तिथे आता सुमारे 200 टन कचरा साठलेला आहे!
या कचर्यामध्ये घन कचरा, मशिन, उपग्रहांचे अवशेष, मानवाचे मलमूत्र, भाला, चिमटे, टॉवेल, ब्रश या गोष्टींचाही समावेश आहे. द गार्डियानच्या रिपोर्टनुसार, मानवाने आतापर्यंत चंद्रावर सुमारे 200 टन कचरा केला आहे. यामध्ये मानवी मलमूत्र आणि उलटीच्या पिशव्याही आहेत.
अंतराळ मोहिमा संपल्यानंतर त्यामधील विविध उपकरणे, उपग्रह हा सर्व घन कचरा ठरतो. अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'च्या अपोलो 11 मिशनद्वारे मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. हे अपोलो यान चंद्रावर जिथे लँड झाले, त्याच्या बाजूला काही वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या पाहायला मिळाल्या. चंद्रावरील 200 टन कचर्यामध्ये अपोलो मिशनचे 5 सॅटर्न-व्ही रॉकेटचे अवशेष मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर इतर देशांच्या अंतराळयानांच्या अवशेष या कचर्यामध्ये आहेत.
याशिवाय चंद्रावर रोबोटिक लँडर्स आणि रोव्हर्सचा ढिगाराही मोठ्या प्रमाणात आहे, ज्याचा आता काहीच उपयोग नाही. त्यांच्या बॅटरी संपल्या आहेत किंवा काहींचा हार्डवेअर खराब झाला आहे. लुना 9 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे पहिले अंतराळयान आहे. त्याचे अवशेष चंद्राच्या पश्चिम ध्रुवावर आहे. क्रॅश झालेल्या आणि तुटलेल्या अंतराळयानाव्यतिरिक्त, अनेक वैयक्तिक सामान देखील चंद्रावर आहे. अंतराळवीरांनी चंद्रमोहिमेदरम्यान सोडलेल्या वस्तूही तेथील कचर्यात आहेत.
यामध्ये मानवी मलमूत्र आणि उलटीच्या 96 पिशव्यांचाही समावेश आहे. याशिवाय, दोन गोल्फ बॉल देखील आहेत. अपोलो-14 मोहिमेदरम्यान अंतराळवीर अलन शेपर्ड यांनी हे दोन गोल्फ बॉल मारले होते. अंतराळवीर एडगर मिशेल यांनी चंद्रावर फेकलेला धातूचा रॉड किंवा भालाही तिथे आहे.