चालकाशिवाय ‘बोईंग’चे ‘स्टारलायनर’ पोहोचले अंतराळ स्थानकावर! | पुढारी

चालकाशिवाय ‘बोईंग’चे ‘स्टारलायनर’ पोहोचले अंतराळ स्थानकावर!

वॉशिंग्टन : बोईंग कंपनीचे नवे ‘स्टारलायनर क्रू कॅप्सूल’ (स्टारलायनर अंतराळयान) कोणत्याही अंतराळवीराशिवाय प्रथमच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दाखल झाले आहे. हे कॅप्सूल चार ते पाच दिवस तिथेच मुक्काम करील. आपले यान अंतराळवीरांना इष्टस्थळी घेऊन जाण्यास सक्षम आहे हे बोईंगने या मोहिमेतून दाखवून दिले आहे. हे विनाचालक असे महत्त्वपूर्ण उड्डाण ठरले आहे.

‘नासा’च्या कमर्शियल क्रू प्रोग्रॅमचा एक भाग म्हणून क्रू-सक्षम सिस्टीमची ‘एंड-टू-एंड’ क्षमतांचे परीक्षण करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. हा ‘स्टारलायनर’चा तिसरा प्रयत्न होता जो यशस्वी ठरला आहे. स्टारलायनर कॅप्सूलचे आयएसएसशी रात्री 8.28 च्या सुमारास डॉकिंग झाले. या यानाचा असा पहिला प्रयत्न डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी सॉफ्टवेअरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने तो फसला. त्यानंतर गेल्यावर्षी ऑगस्टमध्येही असा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी काही प्रणोदक वॉल्व नीट काम करीत नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे लिफ्टऑफच्या काही तास आधीच उड्डाण रोखण्यात आले होते. अमेरिकन एअरोस्पेसची दिग्गज कंपनी ‘बोईंग’ने आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आपले अंतराळयान पाठवून आपली या क्षेत्रातील क्षमता सिद्ध केली आहे.

Back to top button