Education director office asked headmasters to fill data on student portal

जातीची माहिती त्वरित भरा; मुख्याध्यापकांना स्टुडंट पोर्टलवरून माहिती भरण्याचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा 
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती मुख्याध्यापकांना स्टुडंट पोर्टलवर भरावीच लागणार आहे. विद्यार्थ्यांची जात आणि आधार क्रमांकाची माहिती भरली जात नाही. त्यामुळे दोन दिवसांमध्ये संबंधित माहिती मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्टुडंट पोर्टल लॉगिनमधून भरावी, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या प्रशासन अधिकार्‍यांनी दिले आहेत. प्रशासन अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार, सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या माहितीत, ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवर्ग व जातविषयक माहितीमध्ये ‘माहिती नाही’ असे नोंदविलेले असेल किंवा माहितीच भरलेली नसेल अशा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाची व जातविषयक माहिती पूर्ण करायची आहे.
तसेच, ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अपूर्ण आहे, त्यांची आधारबाबतची माहितीदेखील पूर्णपणे नोंदवावयाची आहे. संबंधित कार्यवाही सर्व शाळांच्या मुख्याध्यापक यांच्या स्टुडंट पोर्टलच्या लॉगिनवरून 20 मेपर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्व जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक/प्रशासन अधिकारी यांना कळवून त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणार्‍या सर्व प्रकारच्या शाळांशी संपर्क साधून प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती अद्ययावत करून घ्यावी. संबंधित कामकाज महत्त्वाचे व कालमर्यादित असल्याने सर्व नागरी तसेच ग्रामीण भागांमधील शाळेच्या स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची वरील सर्व माहिती दिलेल्या मुदतीत पूर्ण करावी आणि अहवाल संचालनालयास सादर करावा, असे आदेश  प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे प्रशासन अधिकारी अमोल पवार यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button