अंटार्क्टिकावर चार महिन्यांच्या रात्रीला प्रारंभ | पुढारी

अंटार्क्टिकावर चार महिन्यांच्या रात्रीला प्रारंभ

पॅरिस : एखादी रात्र जर चार महिन्यांची असेल तर? आपल्याला याबाबत आश्‍चर्य वाटत असले तरी ध्रुवीय प्रदेशांमध्ये हे काही नवलाईचे नाही. उत्तर गोलार्धात आता उन्हाळा आहे आणि दक्षिण गोलार्धात हिवाळा सुरू झालेला आहे. दक्षिण ध्रुव म्हणजेच अंटार्क्टिका मध्ये आता चार महिन्यांची रात्र सुरू झाली आहे. 13 मे रोजी तिथे असा सूर्यास्त झाला की पुन्हा सूर्यदर्शन चार महिन्यांनीच होईल!

अंटार्क्टिका हे एक निर्जन व अतिथंड ठिकाण असले तरी संशोधनासाठी तिथे विविध देशांचे वैज्ञानिक राहत असतात. काही लोकांसाठी ही दीर्घ रात्र कडाक्याच्या थंडीचा व अन्य समस्यांचा सामना करण्यासाठी खडतर ठरू शकते. मात्र, ही वेळ काही अंतराळवीरांसाठी विविध प्रयोगांच्या द‍ृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. पृथ्वीवरच अशा स्थितीचा अनुभव घेऊन ते अंतराळ मोहिमांची किंवा अन्य ग्रहांवरील स्थितीची तयारी करू शकतात. सूर्यप्रकाशाची अनुपस्थिती आणि कडक थंडीत ते अत्यंत खडतर स्थितीत आपले ट्रेनिंग पूर्ण करू शकतात.

अंटार्क्टिका मधील दूरस्थ बेस असलेल्या कॉनकॉर्डियामध्ये पुन्हा एकदा युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या बारा सदस्यांचे एक पथक आयसोलेशनमध्ये राहून काम करणार आहे. या टीमच्या मिशनमध्ये विविध प्रयोगांचा समावेश आहे. अशा खडतर स्थितीत राहण्याचा मानवी शरीरावर कोणता परिणाम होतो हे यामधून तपासले जाईल. या बेसवर सर्व प्रकारची जीवनावश्यक सामग्री किमान नऊ महिने पुरेल इतक्या प्रमाणात आहे. येत्या काही दिवसांमध्ये तेथील तापमान उणे 80 अंश सेल्सिअसपर्यंतही उतरू शकते.

Back to top button