‘डीएनए’मध्ये बदल करून रोखता येईल हार्टअ‍ॅटॅक, समोर आला प्रभावी उपाय | पुढारी

‘डीएनए’मध्ये बदल करून रोखता येईल हार्टअ‍ॅटॅक, समोर आला प्रभावी उपाय

वॉशिंग्टन : जगात सर्वाधिक मृत्यू ज्या कारणांमुळे होतात त्यामध्ये हार्टअ‍ॅटॅकचा समावेश आहे. काही इंजेक्शन आणि औषधे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करू शकतात; पण एखाद्या रुग्णाला हार्टअ‍ॅटॅक पासून पूर्णपणे सुरक्षित करणे शक्य होत नाही. आता यावर अमेरिकेतील बायोटेक कंपनी वर्व थेराप्यूटिक्सने एक प्रभावी उपाय शोधला आहे. कंपनीचे सीईओ डॉ. सेकर कथिरेसन यांनी सांगितले की एखाद्या मानवाच्या डीएनएमध्ये बदल करून त्याच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखता येणे शक्य आहे. हा हार्टअ‍ॅटॅकवरील कायमचा उपाय ठरू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 2019 मध्ये हृदयविकाराने सुमारे 1.8 कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 85 टक्के मृत्यूंचे कारण हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोक हेच होते. ‘वर्व थेराप्यूटिक्स’च्या माहितीनुसार ‘डीएनए’मध्ये बदल करण्याच्या तंत्राचा वापर सर्वात आधी अशा लोकांवर करता येईल ज्यांना हाय कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे.

हा एक अनुवंशिक आजार असतो व त्याला ‘हायपरकोलेस्ट्रॉलीमिया’ असे म्हटले जाते. या आजाराने जगभरात दरवर्षी 3.1 कोटी लोक ग्रस्त होतात. जर हे तंत्र खराब कोलेस्टेरॉलला रोखण्यात यशस्वी ठरले तर या संशोधनात तरुण वर्गालाही सहभागी करून घेता येईल जेणेकरून त्यांना हार्टअ‍ॅटॅक पासून संरक्षण मिळेल. मात्र, हे कधी घडेल याची माहिती कंपनीने दिली नाही.

डॉ. कथिरेसन हे प्रसिद्ध जेनेटिसिस्ट आणि कार्डियोलॉजिस्ट आहेत. त्यांनी अशा जेनेटिक म्युटेशन्सचा शोध लावला आहे ज्यांच्या मदतीने शरीरातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे हार्टअ‍ॅटॅकची शक्यता आपोआपच कमी होते. सध्या वर्व थेराप्यूटिक्स अशी दोन औषधे विकसित करीत आहे जी मानवाच्या डीएनएमधील दोन जनुकांना लक्ष्य बनवतील. या जनुकांची नावे ‘पीसीएसके-9’ आणि ‘एएनजीपीटीएल-3’ अशी आहेत. काही रुग्णांना एकच औषध पुरेसे ठरेल तर काहींना दोन औषधे घेऊन आराम मिळेल.

Back to top button