पक्षी जैवविविधता : जलवायू परिवर्तनामुळे घटतेय पक्ष्यांची संख्या | पुढारी

पक्षी जैवविविधता : जलवायू परिवर्तनामुळे घटतेय पक्ष्यांची संख्या

वॉशिंग्टन : जगभरात पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत असल्याचा निष्कर्ष नव्या संशोधनात काढण्यात आला आहे. संशोधनातील माहितीनुसार नैसर्गिक अधिवास घटणे, काही पक्ष्यांचे होत असलेले अत्याधिक शोषण व अन्य कारणांमुळे पक्ष्यांच्या जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. यास जलवायू परिवर्तन हे प्रमुख कारण जबाबदार असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.

‘कार्नेल युनिव्हर्सिटी’च्या वतीने करण्यात आलेले हे संशोधन ‘अ‍ॅन्युअल रिव्ह्यू ऑफ एन्व्हायर्न्मेंट अँड रिसोर्स’ नामक जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. संशोधनाचे प्रमुख लेखक अ‍ॅलेक्झांडर लिज यांनी सांगितले की, सध्या आम्ही पक्ष्यांच्या अनेक प्रजातींच्या महाविनाशाच्या लाटेच्या सुरुवातीचे संकेत पाहत आहोत. हे संकट उष्ण कटिबंधामध्ये जास्त आहे. याच भागातील पक्ष्यांच्या अनेक प्रजाती संकटात असून त्यांची संख्या वेगाने घटू लागली आहे.

या संशोधनातील निष्कर्षानुसार जगभरातील पक्ष्यांच्या एकूण प्रजातींपैकी 47 टक्के प्रजाती अशा आहेत की, त्या प्रजातींमधील पक्ष्यांची संख्या वेगाने घटत चालली आहे. तर 39 टक्के प्रजातींमधील पक्ष्यांची संख्या स्थिर आहे. तसेच सहा प्रजाती अशा आहेत की, त्या प्रजातींमधील पक्ष्यांची संख्या वाढू लागली आहे. तर उर्वरित 7 टक्के प्रजातींच्या स्थितीबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
या संशोधनादरम्यान संशोधकांनी 11 हजार पक्ष्यांच्या प्रजातींचे संशोधन केले. केवळ अमेरिका आणि कॅनडातच गेल्या 50 वर्षांत तब्बल 3 अब्ज पक्षी मृत पावले आहेत.

LIVE: लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त कृतज्ञता सभा

Back to top button