चंद्रावर पृथ्वीवरूनच पोहोचले होते पाणी! | पुढारी

चंद्रावर पृथ्वीवरूनच पोहोचले होते पाणी!

वॉशिंग्टन : ‘चंद्र कोरडाठाक असून तिथे पाणी नाही’ असे एके काळी म्हटले जात होते. मात्र, विज्ञानातही आज जो सिद्धांत असतो तो उद्या नवा सिद्धांत आला की मोडीत निघतो! भारताच्याच ‘चांद्रयान-1’ मोहिमेमध्ये चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे सर्वप्रथम सिद्ध झाले होते. चंद्रावर पृष्ठभागाखाली असलेल्या बर्फाच्या रूपातही पाण्याचे अस्तित्व आहे. चंद्रावर हे पाणी कसे आले याबाबत आता वेगवेगळी मते मांडली जात आहेत. आता एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की चंद्रावरील हे पाणी पृथ्वीवरूनच आलेले आहे!

या स्टडीमध्ये म्हटले आहे की अब्जावधी वर्षांपासून चंद्र पृथ्वीच्या वातावरणातूनच पाणी शोषून ते आपल्या विवरांमध्ये बर्फाच्या रूपात जमा करीत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का फेयरबँक्सने आपल्या संशोधनात म्हटले आहे की पाणी बनवणार्‍या आयनला चंद्र खेचून घेतो. याचे कारण म्हणजे तो पृथ्वीच्या मॅग्‍नेटास्फियरच्या हिश्श्यामधून जातो. यापूर्वी असे म्हटले जात होते की लघुग्रहाची टक्‍कर आणि सूर्याकडून ऑक्सिजन व हायड्रोजन आयनांचे उत्सर्जन यामुळे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व निर्माण झाले असावे.

संशोधकांच्या टीमने अनुमान लावले आहे की चंद्रावर 840 घन मैल पृष्ठभागावर पाणी आहे जे पृथ्वीच्या वातावरणातूनच तिथे पोहोचलेले आहे. चंद्रावर इतके पाणी आहे की त्यामुळे अमेरिकेतील हुरोन नावाचे सरोवर पूर्णपणे भरू शकेल. हे सरोवर जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर आहे. चंद्रावर खडकांच्या खाली बर्फात पाणी आहे. दगडांच्या खाली असल्याने तसेच चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राच्या ढालीमुळे ते सूर्यकिरणांपासून सुरक्षित आहेत. भविष्यात जर मानवाने चंद्रावर वसाहत बनवली तर हे बर्फाच्या रूपातील पाणीच त्यांच्यासाठी पाण्याचा स्रोत बनू शकेल.

Back to top button