माईक आणि स्पीकरचे काम करणारे कापड! | पुढारी

माईक आणि स्पीकरचे काम करणारे कापड!

न्यूयॉर्क : मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी एक नव्या प्रकारचे फॅब्रिक म्हणजेच कापड विकसित केले आहे. हे कापड माईक आणि स्पीकरचे काम करते. माणसाच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पानांची सळसळही ते सहजपणे टिपून घेते.

‘नेचर’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. आवाज पकडणारे हे फायबर्स म्हणजेच तंतू एका कापडात विणलेले आहेत. ज्यावेळी एखादा माणूस या कापडापासून बनवलेला पोशाख परिधान करतो त्यावेळी हे फायबर्स ध्वनी पकडतात. हा पोशाख परिधान केलेल्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोकेही ते टिपून घेऊ शकते. संशोधक यान यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की कापड आणि आवाजांचा संबंध शेकडो वर्षांपासून आहे.

आतापर्यंत आपण कापडाचा वापर करून आपला आवाज ‘मॉडिफाय’ करण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, कापडाला माईकऐवजी वापरणे ही एक अनोखी संकल्पना आहे. यान आता सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्य कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की हे कापड ट्वारन नावाचे मटेरियल आणि कॉटनपासून बनवलेले आहे. या धाग्यांचे कॉम्बिनेशन ध्वनी ऊर्जेला लहरींमध्ये रूपांतरीत करते. याबरोबरच कापडात एका स्पेशल फायबरचाही वापर करण्यात आला आहे. ते पीजोइलेक्ट्रिक मटेरियलपासून बनवलेले आहे.

अशा मटेरियलला दाबल्याने किंवा दुमडल्याने व्होल्टेज निर्माण होते. त्यानंतर हे सिग्नल्स एका उपकरणाच्या माध्यमातून रेकॉर्ड करून वाचले जातात. माईकसारखे काम करीत असलेले हे कापड अनेक रेंज आणि लेव्हलचे ध्वनी पकडण्यात सक्षम असतात. एक शांत लायब्ररी आणि गोंगाट असलेली रहदारी यामधील फरक ते समजून घेऊ शकते. या संशोधनात सहभागी असलेले संशोधक योगेंद्र मिश्रा यांनी सांगितले की अशा स्पेशल फायबर्सपासून एक शर्टही तयार करण्यात आला आहे. त्याने माणसाच्या हृदयाचे ठोकेही ऐकले!

Back to top button