वॉशिंग्टन : एलन मस्क यांनी ट्विटरची 100 टक्के भागीदारी खरेदी केल्यावर ट्विटरचा आजपर्यंतचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ट्विटरची सुरुवात कशी झाली, कुणी आधी ट्विट केले होते, हे ट्विट कोणते होते याबाबत लोकांना कुतुहल वाटत आहे.
ट्विटरच्या स्थापनेपासून अनेक बदल झाले आहेत. मार्च 2006 मध्ये तंत्रज्ञानाचे जाणकार असलेले उद्योजक जॅक डोर्सी, बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांनी ट्विटरची निर्मिती केली होती. 'फ्लिकर' हा शब्द ऐकून या टीमला त्याच्या नावाची कल्पना सूचली. त्यानंतर त्यांनी या ब्लू बर्ड ड्रीम कंपनीला "twttr" असे संबोधले. जॅक डोर्सी यांनी पहिले ट्विट केले होते व त्यामध्ये लिहिले होते 'जस्ट सेटिंग अप माय ट्विटर'.
22 मार्च 2006 ला भारतीय वेळेनुसार रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी जॅक डोर्सी यांनी हे ट्विट केले. त्यांनी या सर्वात पहिल्या ट्विटला क्रिप्टोकरन्सीच्या रूपात विकण्याची घोषणा केली होती. या ट्विटला विकत घेण्यासाठीही कोटींच्या घरात बोली लागली होती. गेल्यावर्षी मार्चमध्येच हे ट्विट 17.37 कोटींना विकण्यात आले. मीडिया रिपोर्टस्नुसार जॅक डोर्सी यांनी ही रक्कम आफ्रिकेतील 'रिस्पॉन्स' नामक एका कंपनीला बिटकॉईनच्या रूपात दान केली आहे. तसेच जॅक डोर्सी यांच्या या ट्विटला एनएफटीचाही दर्जा मिळाला आहे.