मुंबई : जगभरात अनेक ठिकाणी समुद्राच्या किंवा अन्य जलाशयांच्या पाण्यावर तरंगणारे तेल यामुळे प्रदूषण होत असते. आता या समस्येवर एका भारतीय संशोधकाने अत्यंत परिणामकारक उपाय शोधला आहे.
अणुऊर्जा विभागाच्या मुंबईतील भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बार्क) मधील या संशोधकाने असे तेल शोषून घेऊन ते पुनर्वापराच्या हेतूने पुन्हा मिळवण्यासाठी एक अनोखा कापूस विकसित केला आहे.
हा कापूस 'सुपर-हायड्रोफोबिक' म्हणजेच पाणी रोखणारा आणि 'सुपर-ऑलिओफिलिक' म्हणजेच 'तेल शोषणारा' आहे. रेडिएशन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने या 'सुपरअॅब्सॉर्बंट'ची निर्मिती करण्यात आली आहे.
तेलामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण रोखणारे असे तंत्र जगात केवळ भारतातच आहे हे विशेष! 'बार्क'च्या डॉ. शुभेंदू रॉय चौधरी यांनी हा कापूस विकसित केला आहे.
'बार्क'चे संचालक डॉ. ए.के. मोहंती यांनी म्हटले आहे की पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे व पाण्याखालील तेल एकाच वेळी हटवण्यासाठी जगात सध्या कोणतेही 'अॅब्सॉर्बंट' म्हणजेच शोषून घेणारा पदार्थ नाही. 'बार्क'च्या 'आयसोटोप अँड रेडिएशन अॅप्लिकेशन डिव्हिजन'मध्ये कार्यरत असलेल्या डॉ. शुभेंदू रॉय चौधरी यांनी हा कापूस विकसित केला आहे.
या शोधासाठी त्यांना भारत सरकारने 'नॅशनल अॅवॉर्ड फॉर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन' या पुरस्काराने सन्मानितही केले आहे. त्यांनी तयार केलेला हा पदार्थ अतिशय प्रभावी आहे. असा एक ग्रॅम पदार्थही पाण्यातून किमान 1.5 किलोग्रॅम तेल गोळा करतो.
हा कापूस केवळ पिळला किंवा त्यावर दाब दिला की त्यामधील तेल पुन्हा वापरासाठी परत मिळू शकते. असा हा 'बायोडिग्रेडेबल सुपरअॅब्सॉर्बंट' अनेक वेळा म्हणजेच अगदी 50 ते शंभर वेळा वापरता येऊ शकतो.
बेंझिन, टोल्यूनी, इथिलबेंझिन, क्लोरोफॉर्म, डिक्लोरो मिथेन, ट्रायब्यूटिल फॉस्फेटसारखे कारखान्यांमधून किंवा शहरातील सांडपाण्यामधून येणारे विषारी पदार्थ पाण्यातून हटवण्यासाठीही या कापसाचा वापर होऊ शकतो. हा कापूस आम्लयुक्त, अल्कलीयुक्त, सागरी पर्यावरण किंवा उच्च तापमानातही टिकून राहून काम करू शकते, हे विशेष.
त्याचा वापर संपला की त्याची योग्यप्रकारे विल्हेवाटही लावता येते. ते 'बायोडिग्रेडेबल' असल्याने पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. तेल हटवण्यासाठीच्या पारंपरिक पद्धतीमुळे पुन्हा दुसरेच प्रदूषण घडत असते.
तसेच पाण्यावरील तेल वायाच जाते. मात्र, या नव्या पदार्थामुळे कोणतेही प्रदूषण न होता असे तेल पुन्हा मिळवता येते. त्यामुळे ते पर्यावरण आणि आर्थिकद़ृष्ट्याही उपयुक्त आहे. डिसेंबर 2020 मध्ये या सुपरअॅब्सॉर्बंटला भारतीय पेटंट मिळाले आहे. त्याच्या निर्मितीचे तंत्र आता एका खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे.