मुंबई : सध्या पावसाळा सुरू आहे आणि देशभर पावसामुळे ठिकठिकाणी पूर येणे, पाणी साचून राहणे असे द़ृश्य दिसत आहे. अशा साठलेल्या पाण्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका संभवतो. त्यापैकीच एक आहे 'लेप्टोस्पायरोसिस'.
लेप्टोस्पायरोसिस हा आजार 'लेप्टोस्पायरा' नावाच्या जीवाणूमुळे फैलावतो आणि बहुतांशवेळा तो संक्रमित प्राण्यांमुळे माणसाला होतो. अर्थात एका माणसातून दुसर्या माणसात त्याचे संक्रमण होण्याचे प्रमाण नगण्यच आहे.
उंदरासारख्या वस्तू कुरतडणार्या प्राण्यांमध्ये याचे संक्रमण झाल्यास त्यांची विष्ठा, मूत्र यामुळे दूषित पाणी तसेच खाद्यपदार्थ व मातीच्या संपर्कात आल्यावरही माणूस संक्रमित होऊ शकतो.
असे प्रकार पावसाळ्यात किंवा पूरस्थिती असल्यावर अधिक प्रमाणात घडतात. मुंबईच्या मसीना हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन डॉ. सुलेमान लधानी यांनी म्हटले आहे की लेप्टोस्पायरोसिसचा जीवाणू त्वचा, तोंड, डोळे आणि नाकाच्या माध्यमातून शरीरात पोहोचतो.
जिथे साफसफाई नसेल, जोरदार पाऊस व पूरस्थिती असेल किंवा एकाच ठिकाणी पाणी अधिक काळ साठून राहिलेले असेल तर तिथे या आजाराचा धोका अधिक असतो. याशिवाय शेतांमध्येही जिथे उंदरांची संख्या अधिक असते तिथे या आजाराचा फैलाव होण्याचा धोका असतो.
संक्रमणानंतर सात ते दहा दिवसांनी त्याची लक्षणे दिसू लागतात. काही वेळा उशिराही लक्षणे दिसतात. त्याची अनेक लक्षणे फ्लू आणि मेनिनजाइटिसशी मिळती-जुळती आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांशी तत्काळ संपर्क साधणे हितावह ठरते.
लक्षणे दिसताच रुग्णाची रक्तचाचणी केली जाते. संक्रमण झालेले असेल तर सफेद रक्तपेशींची संख्या अधिक आणि प्लेटलेटस्ची संख्या कमी झालेली असू शकते. कमी वेळेत आजाराचे निदान करण्यासाठी रुग्णाची एलाइजा टेस्ट केली जाते.
आपल्या देशात या आजाराचे रुग्ण बहुतांशवेळी पूर व वादळाचा तडाखा बसलेल्या ठिकाणीच अधिक असतात. जर संक्रमण गंभीर असेल तर शरीरातील अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र, सर्वसाधारणपणे लेप्टोस्पायरा जीवाणूने संक्रमित रुग्ण एका आठवड्यातच बरा होऊ शकतो.
केवळ पाच ते दहा टक्के रुग्णांना बरे होण्यासाठी थोडा वेळ लागतो. पुराच्या किंवा दीर्घकाळ साठलेल्या पाण्यातून जात असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. उंच गमबूट किंवा हँडग्लोजसारख्या साधनांचा वापर हितावह ठरतो.