

प्राग : पूर्वी वेगळ्याच रसायनापासून सोने बनवू शकणारे 'किमयागार' होते असे म्हटले जाते. आता झेक प्रजासत्ताकमधील आधुनिक किमयागारांनीही अशीच एक किमया करून दाखवली आहे. त्यांनी चक्क पाण्यापासूनच सोने बनवून दाखवले आहे. प्रागच्या 'झेक अॅकॅडमी ऑफ सायन्सेज'मधील फिजिकल केमिस्टनी ही 'किमया' केली आहे! त्यांनी पाण्याचे रूपांतर सोनेरी, चमकणार्या धातूत केले.
सर्वसाधारणपणे एखाद्या वस्तूवर अत्याधिक दाब पडला की त्याचे रूपांतर धातूमध्ये होत असते. त्यांच्यामधील अणू किंवा रेणू इतके जवळ येतात की त्यांच्या बाहेरील इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये विभागले जातात आणि त्यांच्या माध्यमातून वीज वाहू शकते. असाच प्रकार पाण्याला 1.5 कोटी अॅटमॉस्फिरिक प्रेशर दिल्यानंतर होऊ शकतो.
मात्र, तसे तंत्र सध्या प्रयोगशाळेत उपलब्ध नाही. संशोधक पावेल जंगवर्थ यांनी त्यासाठी अन्य पर्याय शोधला. 'इलेक्ट्रॉन शेअरिंग'साठी त्यांनी 'अल्कली मेटल'चा वापर केला. हा सोडियम-पोटॅशियमसारख्या प्रतिक्रिया देणार्या घटकांचा समूह असतो.
मात्र, हे एक आव्हानही होते. याचे कारण म्हणजे पाण्याच्या संपर्कात येताच ते भयानक स्फोटकामध्ये रूपांतरीत होते. त्यामुळे असा प्रयोग करण्यात आला ज्यामध्ये त्यांची प्रतिक्रिया (रिअॅक्शन) धीमी होईल आणि स्फोट होणार नाही. एका सिरिंजमध्ये पोटॅशियम आणि सोडियम भरण्यात आले जे सामान्य तापमानात द्रवरूपात असते.
त्यानंतर ते 'व्हॅक्युम चेम्बर' म्हणजेच निर्वात पोकळीत ठेवण्यात आले. सिरिंजमधील या मिश्रणाचे काही थेंब काढून त्यांना कमी प्रमाणात वाफ देण्यात आली. या थेंबांवर पाणी काही सेकंदांसाठी जमा झाले. अपेक्षेप्रमाणेच मिश्रणाच्या थेंबांमधून इलेक्ट्रॉन पाण्यात गेले आणि काही वेळेसाठी पाणी सोनेरी झाले!