लंडन : जगभरात दरवर्षी मलेरिया मुळे सुमारे 5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. मृत्यूचे हे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच मलेरियाचे रुग्ण घटवण्यासाठी वैज्ञानिकांनी नवा प्रयोग केला आहे. त्यांनी मलेरिया फैलावणार्या मादी डासांना 'सीआरआयएसपीआर जीन एडिटिंग' तंत्राने अप्रजननक्षम बनवले जात आहे. त्यामुळे डासांची संख्याही नियंत्रणात राहू शकते.
संशोधकांचे म्हणणे आहे की हे तंत्र 'गेम चेंजर' ठरू शकते आणि त्यामुळे या जीवघेण्या आजाराचाही नायनाट केला जाऊ शकतो. याबाबत लंडनचे इम्पिरियल कॉलेज आणि 'लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन'चे संशोधक एकत्रितपणे संशोधन करीत आहेत.
वैज्ञानिक प्रथमच मादी डासांच्या जनुकांमध्ये अशा प्रकारचे बदल करीत आहेत जेणेकरून त्या प्रजनन करू शकणार नाहीत. त्यासाठी संशोधकांनी डासांच्या 'अॅनाफिलीस गॅम्बी' या प्रजातीची निवड केली आहे. हीच प्रजाती सब-सहारा आफ्रिकामध्ये मलेरिया चा फैलाव होण्यासाठी जबाबदार आहे. मादी डासांना वांझ बनवण्यासाठी त्यांच्यामधील 'डबलसेक्स जीन'मध्ये बदल घडवून आणले जातात.
प्रयोगावेळी असे दिसून आले की 560 दिवसांमध्ये डासांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. संशोधकांचे म्हणणे आहे की मच्छरदाणी, कीटकनाशक आणि लसीबरोबरच 'जीन एडिटिंग' हा मलेरियावर मात करण्याचा वेगवान मार्ग आहे. त्याच्या सहाय्याने मोठा बदल घडवून आणला जाऊ शकतो.