न्यूयॉर्क : एके काळी पृथ्वीवर विविध प्रजातींच्या डायनासोर चे साम्राज्य होते. मात्र, 6.6 कोटी वर्षांपूर्वी हे साम्राज्य उद्ध्वस्त होत असतानाही सध्याच्या पक्ष्यांचे पूर्वज कसे तग धरून राहिले याबाबत संशोधकांना कुतुहल वाटत होते. आता हे रहस्य उलगडण्यात त्यांना यश मिळाले आहे. वैशिष्ट्यपूर्ण अशा मेंदूच्या आकारामुळे पक्ष्यांचे पूर्वज त्या काळात टिकून राहिले असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यासाठी एका जीवाश्माच्या अभ्यासाची संशोधकांना मदत झाली.
अमेरिकेच्या ऑस्टिनमध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीच्या एका टीमने या जीवाश्माचा शोध लावला होता. हे जीवाश्म सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वीचे आहे. या पक्ष्याची जवळजवळ संपूर्ण अवस्थेतील कवटी जीवाश्मात आहे.
ही एक अतिशय दुर्मीळ अशी घटना आहे. त्यामुळेच संशोधकांना त्या काळातील पक्ष्यांची सध्याच्या पक्ष्यांशी तुलना करता येणे सोपे गेले. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'सायन्स अॅडव्हान्सेस' नावाच्या नियतकालिकात देण्यात आली आहे. हे जीवाश्म 'इचिथोर्निस' नावाच्या एका पक्ष्याचे आहे.
कालौघात हे पक्षी 'नॉन-एव्हियन डायनासोर' म्हणजेच उडता न येणार्या डायनासोरप्रमाणेच लुप्तही झाले होते. त्यांच्यामध्ये उडणार्या आणि न उडणार्या अशा दोन्ही प्रकारच्या डायनासोरचे मिश्रण होते. त्यांना एक चोचही होती आणि दातांनी भरलेला जबडाही होता.
युटी कॉलेज ऑफ नॅचरल सायन्सेजमधील ख्रिस्तोफर टोरेस यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की सध्याच्या पक्ष्यांमध्ये सस्तन प्राणी वगळता अन्य कोणत्याही प्राण्यांच्या तुलनेत अखिक जटिल मेंदू असतो. या जीवाश्मावरून असे दिसून आले की अशाच जटील मेंदूमुळे तत्कालीन पक्ष्यांना टिकून राहण्यासाठी मदत मिळाली.
या पक्ष्याची कवटी मेंदूला चारही बाजूने करकचून पकडणारी आहे. त्यांच्या मेंदूचा आकारही वैशिष्ट्यपूर्ण होता. त्यामुळेच ते अधिक सावध राहत असल्याने मोठ्या आपत्तींमधूनही स्वतःचा बचाव करू शकत होते.