तीन अंतराळ पर्यटकांसह ‘स्पेस एक्स’च्या यानाचे उड्डाण | पुढारी

तीन अंतराळ पर्यटकांसह ‘स्पेस एक्स’च्या यानाचे उड्डाण

वॉशिंग्टन : एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेस एक्स’ने अंतराळ पर्यटनाच्या क्षेत्रात आता नवी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीची पूर्णपणे खासगी मोहीम कंपनीने सुरू केली असून ही कंपनीची पहिलीच अंतराळ पर्यटन मोहीम आहे. तीन अंतराळ पर्यटकांना ‘ क्रू ड्रॅगन’ कॅप्सूलमध्ये घेऊन स्पेस एक्सच्या ‘फाल्कन 9’ रॉकेटने अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. यामध्ये तीन ग्राहकांसमवेत ‘नासा’चा एक माजी अंतराळवीर आहे.
दहा दिवसांच्या या टूरसाठी एका सीटची किंमत सुमारे 417 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. पृथ्वीच्या खालील स्तरातील कक्षेतील पर्यटनासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’, स्टार्टअप कंपनी ‘एक्सिओम’ आणि ‘स्पेस एक्स’ने भागिदारी केली आहे. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून ‘फाल्कन 9’ रॉकेट ‘ड्रॅगन’ या कॅप्सूलला (यान) घेऊन अंतराळात उड्डाण केले. ‘नासा’चे प्रमुख बिल नेल्सन यांनी या लिफ्ट-ऑफच्या आधी म्हटले होते की आम्ही कमर्शियल बिझनेसला पृथ्वीवरून अंतराळात घेऊन जात आहोत. अंतराळ स्थानकावर आतापर्यंत अनेक पर्यटक जाऊन आले आहेत. मात्र, आता या मोहिमेतून अंतराळ प्रवाशांची पहिली कमर्शियल टीम तिथे गेली आहे. या पर्यटकांमध्ये अमेरिकन रिअल इस्टेट गुंतवणूकदार लॅरी कोन्‍नोर, कॅनेडियन गुंतवणूकदार मार्क पॅथी आणि इस्रायलमधील लढाऊ विमानांचा माजी पायलट इटान स्टीब्बे यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत ‘नासा’च्या माजी अंतराळवीर मायकल लोपेज-अ‍ॅलेग्रीया हा आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि स्पेनचे दुहेरी नागरिकत्व असून त्याने यापूर्वी 2007 मध्ये अखेरचा अंतराळ प्रवास केला होता.

Back to top button