Giant Rasgulla | दीड किलोचा ‘गालफाड’ रसगुल्ला!

Giant Rasgulla | दीड किलोचा ‘गालफाड’ रसगुल्ला!
Published on: 
Updated on: 

गयाजी : दिवाळी आणि मिठाई यांचे एक अतूट समीकरण आहे. हल्ली देशभरात अनेक हलवाई दुकानांमध्ये ‘हटके’ मिठायाही मिळत आहेत. काही सोन्या-चांदीने मढवलेल्या असतात, तर काहींचा आकार वेगळा असतो. बिहारमधील गयाजी जिल्ह्यातील पंचानपूर येथील ‘पंडित जी मिठाई दुकान’ आपल्या महाकाय आणि प्रसिद्ध रसगुल्ल्यासाठी संपूर्ण भारतात ओळखले जाते. येथील एकच रसगुल्ला (गालफाड रसगुल्ला) जवळजवळ फुटबॉलच्या आकाराएवढा मोठा असतो, ज्याचे वजन तब्बल १.५ किलोग्राम पर्यंत असते. या रसगुल्ल्याचा दर ३०० रुपये प्रतिकिलो आहे.

दुकानदार अनिल मिश्र यांनी या दुकानाच्या रंजक इतिहासाबद्दल सांगताना सांगितले की, जमीनदारी पद्धतीच्या काळात त्यांचे आजोबा रामचंद्र मिश्र हे स्थानिक टेकरी रियासत महाराजांच्या टीकारी पंचदेवता मंदिरात पुजारी म्हणून पूजा-अर्चा करत असत. जमीनदारी संपल्यानंतर त्यांनी बिहारबाहेर पडून उज्जैन, उन्नाव आणि लखनौ येथे जाऊन मिठाई बनवण्याची कला शिकून घेतली. त्यानंतर त्यांनी लखनौच्या रेल्वे कँटीनमध्ये ९ वर्षे कंत्राटी कामगार म्हणून सेवा दिली. मात्र, जेव्हा कायमस्वरूपी नोकरभरतीची वेळ आली, तेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना ‘कलर ब्लाइंडनेस’ (रंगांधळेपणा) असल्याचे सांगून नोकरीवरून काढून टाकले.

या अन्यायानंतर रामचंद्र मिश्र यांनी हार मानली नाही. त्यांनी दिल्ली, मुंबई, कोलकाता, जमशेदपूर आणि पाटणा यांसारख्या मोठ्या शहरांत आपल्या मिठाई बनवण्याच्या कौशल्याचे प्रदर्शन केले. अनेक शहरांत नावलौकिक मिळवल्यानंतर त्यांनी शेवटी आपल्याच शहरात दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गयाजी शहरातील गांधी मैदान पॉवर स्टेशनजवळील महावीर मंदिराजवळ पहिले दुकान सुरू केले, परंतु काही महिन्यांतच ते बंद पडले. त्यानंतर १९६९ मध्ये त्यांच्या एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी पंचानपूर येथील लभरा गावातील ओसाड जमिनीवर एका छोट्या झोपडीत दुकान थाटले. त्याकाळी पंचानपूरमध्ये एकही दुसरे दुकान नव्हते. सुरुवातीला त्यांनी समोसे आणि नमकीन विकण्यास सुरुवात केली. एका प्रसंगी स्थानिक नागरिक आणि ग्राहकांनी त्यांच्याकडे रसगुल्ला खाण्याची इच्छा व्यक्त केली.

कथेनुसार, परिसरातील एका फौजदाराने पंडितजींना काहीतरी वेगळ्या आणि अत्यंत मोठ्या आकाराचा रसगुल्ला बनवण्यास सांगितले. पंडितजींनी एक अवाढव्य रसगुल्ला तयार केला, जो फौजदाराने तत्कालीन आयजी फझल अहमद यांना भेट दिला. आयजी साहेबांना या रसगुल्ल्याची चव आणि आकार इतका आवडला की त्याची चर्चा सर्वत्र पसरली. त्यानंतर ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे पंडितजींनी नियमितपणे असे मोठे रसगुल्ले बनवण्यास सुरुवात केली. हा रसगुल्ला इतका मोठा असतो की, तोंडात घातल्यावर गाल फाटतील, म्हणून ‘गालफाड’ नाव पडले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.