लंडन : हजारो वर्षे जुन्या असलेल्या प्लेग या आजारावर ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपच्या संशोधकांनी लस विकसित केली आहे. कोरोना लसी च्या धर्तीवरच ही लस तयार करण्यात आली असून तिच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या लवकरच सुरू होतील.
त्यामध्ये 18 ते 55 वर्षे वयोगटातील 40 जणांना सहभागी करून घेतले जाईल. या चाचणीवेळी लसीचे साईड इफेक्ट आणि आजाराशी लढण्यासाठी बनणार्या अँटिबॉडी किती परिणामकारक आहेत हे समजून घेतले जाईल.
सध्याच्या काळातही जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे प्लेगचे रुग्ण समोर येत असतात. त्यामुळे त्यावरील अशी लस गरजेची आहे. प्लेगची सर्वाधिक प्रकरणे आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेच्या ग्रामीण भागात दिसून येतात.
ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे संचालक सर अँड्र्यू पोलार्ड यांनी म्हटले आहे की कोरोना महामारीने लसीचे महत्त्व समजावले आहे आणि जीवाणू-विषाणूंपासून बचाव करणे किती गरजेचे आहे हे दाखवले आहे. हजारो वर्षांपासून माणूस प्लेगशी झुंजत आला आहे. आजही त्याचे भय कायम आहे हे विशेष.
त्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रभावी लसीची आवश्यकता आहे. येर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे प्लेग हा आजार होतो. या जीवाणूचा व पर्यायाने आजाराचा वाहक असतात उंदीर. अशा संक्रमित उंदरांमुळे हा आजार फैलावतो.
प्लेग झाल्यावर तीव्र ताप, श्वासोच्छ्वासास अडथळा, काखेत किंवा जांघेत गाठ येणे अशी लक्षणे दिसतात. संक्रमित माणसाच्या लाळेच्या संपर्कात आल्याने अन्य लोकांनाही संसर्ग होऊ शकतो. अँटिबायोटिक्सच्या मदतीने त्यावर उपचार होऊ शकतात.
मात्र, ग्रामीण भागात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्ण वाढू शकतात. आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील ग्रामीण भागासह जगभरात 2010 ते 2015 या काळात प्लेगचे 3,248 रुग्ण आढळले होते.