गुरूचा चंद्र ‘गॅनिमिड’वर पाण्याची वाफ | पुढारी

गुरूचा चंद्र ‘गॅनिमिड’वर पाण्याची वाफ

वॉशिंग्टन : शनि आणि गुरू या दोन ग्रहांचे सत्तरपेक्षाही अधिक चंद्र आहेत. त्यापैकी काही चंद्रांचे जीवसृष्टीच्या शक्यतेबाबत सातत्याने संशोधन होत असते. आता खगोल शास्त्रज्ञांनी ‘हबल’ दुर्बिणीच्या सहाय्याने गुरूचा एक चंद्र ‘गॅनिमिड’वरील वातावरणात पाण्याची वाफ असल्याचे शोधले आहे. या शोधासाठी दुर्बिणीने नोंदवलेल्या नव्या आणि जुन्या आकडेवारीचे अध्ययन करण्यात आले.

‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली. ज्यावेळी एखाद्या चंद्रावरील बर्फाचे घनरूपातून वायूरूपात रूपांतर होते त्यावेळी अशी वाफ बनते.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की गॅनिमिड हा आपल्या सौरमालिकेतील सर्वात मोठ्या आकाराचा नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्र आहे. या चंद्रावर पृथ्वीवरील सर्व समुद्रांपेक्षाही अधिक प्रमाणात पाणी असल्याचे यापूर्वीही पुरावे आढळलेले आहेत.

मात्र, तेथील तापमान इतके कमी आहे की चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे रूपांतर बर्फात झालेले आहे. तेथील वातावरणातील पाण्याच्या वाफेचा छडा लावण्यासाठी ‘हबल’ने नोंदवलेल्या गेल्या दोन दशकातील नोंदींचा अभ्यास करण्यात आला.

‘हबल’च्या स्पेक्ट्रोग्राफने 1998 मध्ये गॅनिमिडच्या पहिल्या अतिनील प्रतिमा टिपल्या होत्या. त्यावरून तेथील विद्युतीय वायूंच्या रंगीबेरंगी रिबनचा आणि तेथील कमजोर चुंबकीय क्षेत्राचा छडा लागला होता.

आण्विक ऑक्सिजनच्या शोधासाठी या प्रतिमांचा व आकडेवारीचा आणखी अभ्यास करण्यात आला. स्टॉकहोम, स्वीडनमधील केटीएच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या लॉरेंज रोथ यांच्या नेतृत्वाखालील टीमने गॅनिमिडच्या वातावरणातील वाफेचा शोध लावण्यासाठी संशोधन केले.

Back to top button