विहीर खोदत असताना सापडला अब्जावधीचा नीलम | पुढारी

विहीर खोदत असताना सापडला अब्जावधीचा नीलम

कोलंबो : बर्‍याच वेळा अशा घटना घडतात की ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ या म्हणीची प्रचिती यावी. श्रीलंकेत एका व्यक्‍तीबाबत असाच प्रकार घडला आहे. तो आपल्या घराच्या आवारात विहीर खोदत असताना त्याला भले मोठे नीलरत्न सापडले. या रत्नाची किंमत सात अब्ज रुपयांपेक्षाही अधिक आहे. हे जगातील सर्वात मोठे नीलम ठरले आहे.

एक वर्षापूर्वी सापडलेल्या या नीलमची माहिती आता जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या नीलमची किंमत दहा कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 अब्ज, 43 कोटी, 75 लाख, 15 हजार रुपये आहे. हा नीलम तब्बल 25 लाख कॅरेटचा आहे.

त्याचे वजन सुमारे 510 किलो आहे. विशेष म्हणजे रतनपुरा नावाच्या गावात गेल्या तीन पिढ्यांपासून रत्नांचीच खरेदी-विक्री करणार्‍या कुटुंबाला हे जगातील सर्वात मोठी नीलम सापडले आहे.

विहिरीचा मालक गामेज यांनी सांगितले की, जे लोक खोदकाम करीत होते, त्यांना हे नीलम दिसून आल्यावर त्यांनी तत्काळ आम्हाला याची माहिती दिली व आम्ही त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना कळवले. हे भले मोठे नीलम स्वच्छ करण्यासाठीच वर्षभराचा कालावधी लागला व त्यानंतर त्याची किंमत ठरवण्यात आली.

श्रीलंकेतील रतनपुरा या शहराला जगातील ‘रत्नांची राजधानी’ असे म्हटले जाते. ही उक्‍ती आता या नीलमने सार्थ ठरवली आहे! हा निलम 40 कोटी वर्षांपूर्वी बनला असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Back to top button