

न्यूयॉर्क : शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचा स्तर वाढल्याने हृदयविकार, स्ट्रोक, हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांना ब्लॉक केल्यामुळे ब्लड क्लॉटिंग म्हणजेच रक्तातील गुठळी तयार होते आणि हार्टअॅटॅकचा धोका निर्माण होतो. आता वैज्ञानिकांनी योग्य आहार-विहार आणि व्यायामाबरोबरच शरीरातील कोलेस्टेरॉल हटवण्यासाठीचा एक सोपा उपाय शोधून काढला आहे.
एका संशोधनातून समोर आले आहे की 'स्टॅटिन' घेतल्याने कोलेस्टेरॉल कमी होते तसेच हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोकाही 13 टक्क्यांनी घटतो. 'द हार्ट प्रोटेक्शन स्टडी'च्या संशोधनात स्टॅटिनच्या प्रभावाची तपासणी करण्यात आली. स्टॅटिन हे कोलेस्टेरॉल कमी करण्याचे निर्धारित औषध आहे. याबाबतच्या संशोधनासाठी सहभागी लोकांना 40 मिलीग्रॅम सिमवास्टॅटिन देण्यात आले. हा स्टॅटिनचा एक प्रकार आहे. या संशोधनात 1994 ते 1997 च्या दरम्यान 20,536 रुग्णांना सहभागी करून घेण्यात आले. रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराने हे रुग्ण त्रस्त होते व अशा आजारामुळे उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरी डिसिजचा धोका उत्पन्न होतो.
या रुग्णांची सरासरी पाच वर्षे पाहणी करण्यात आली. संशोधनातून असे दिसून आले की रोज 40 मिलीग्रॅम सिमवास्टॅटिन घेतल्याने रुग्णांमधील कोलेस्टेरॉल (कमी घनत्वाचे लिपोप्रोटिन) कमी होण्याबरोबरच मृत्यूचा धोकाही 13 टक्क्यांनी घटला. 'एलडीएल कोलेस्टेरॉल'ला 'खराब कोलेस्टेरॉल' म्हणून ओळखले जाते. ते धमन्यांच्या भिंतींशी चिकटून बसते व त्यामुळे धमन्या संकुचित होतात. त्यावर हे स्टॅटिन उपयुक्त ठरले आहे.