सर्वात लांब पायांच्या तरुणीस जोडीदाराची प्रतीक्षा | पुढारी

सर्वात लांब पायांच्या तरुणीस जोडीदाराची प्रतीक्षा

मॉस्को : रशियातील इकाटेरिना लिसिना या तरुणीची ‘सर्वात लांब पाय असलेली महिला’ अशी गिनिज बुकमध्ये नोंद आहे. तिची उंची तब्बल 6 फूट 9 इंच आहे. जगातील सर्वात उंच मॉडेल म्हणूनही ती ओळखली जाते. मात्र, या उंचीमुळेच ती सध्या त्रस्त झाली आहे. या ताडमाड उंचीमुळे तिला जोडीदार मिळणे कठीण झाले आहे.

लिसिनाच्या डाव्या पायाची लांबी 132.8 सेंटीमीटर आणि उजव्या पायाची लांबी 132.2 सेंटीमीटर आहे. 29 वर्षांची लिसिना एक व्यावसायिक मॉडेल आहे. विशेष म्हणजे ती ऑलिम्पिक मेडलिस्टही आहे. ती यापूर्वी व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू होती. 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्या संघाने बझपदक पटकावले होते. त्यानंतर तिने क्रीडा क्षेत्रातून निवृत्ती घेतली आणि मॉडेलिंग सुरू केले. या दोन्ही क्षेत्रांत तिच्या लांबसडक पायांची तिला मदतच झाली. मात्र, आता आयुष्याचा जोडीदार शोधत असताना तिला या पायांनीच त्रस्त केले आहे. आपल्या उंचीमुळे योग्य जोडीदार मिळणे कठीण झाले असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. आपल्यापेक्षा एक फूट कमी उंचीच्या तरुणाशी डेटिंग करण्यास आपण तयार असल्याचे तिने म्हटले आहे. सध्या ती डेटिंग अ‍ॅप्सवर आपल्या उंचीला साजेशा तरुण शोधत आहे.

Back to top button