थायलंडमध्ये सापासारखा अनोखा केसाळ जीव | पुढारी

थायलंडमध्ये सापासारखा अनोखा केसाळ जीव

बँकॉक : सध्या सोशल मीडियात थायलंडमधील एका अनोख्या प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन फूट लांबीच्या या प्राण्याबाबत लोकांचे कुतुहल वाढले आहे. हिरवट रंगाचा आणि मोठे केस असलेला हा सापासारखा जीव नेमका कोणत्या प्रजातीचा आहे याचे कोडे अनेकांना पडले आहे.

जगभरातील पशू-पक्ष्यांचा तसेच अन्यही जीवांच्या अनेक प्रजाती आहेत. या लाखो प्रजातींपैकी अनेक प्रजाती अद्यापही विज्ञानाला अज्ञातच असून वेळोवेळी अशा नवनव्या प्रजातींचा शोध लागत असतो. त्यामुळे हा प्राणीही अशाच अज्ञात प्रजातीचा आहे का असा प्रश्न नेटकर्‍यांना पडला. या व्हिडीओमुळे इंटरनेटवर मोठाच ‘बझ’ निर्माण झाला! अनेकांनी हा जीव आपण कधीही पाहिलेला नसल्याचे सांगितले. काही लोक हा साप असावा असेही म्हणत असले तरी तसे नाही हे उघडच आहे!

कल्पनाविश्वात रमणार्‍या अनेकांनी त्याला ‘ड्रॅगन’ही संबोधले! हा जीव थायलंडमधील एका दलदलीत सापडल्याचे म्हटले जाते. सखोन नाखोन प्रांतातील एका माणसाने दलदलीत हा विचित्र प्राणी वळवळत असताना पाहिले. त्याला पाहून आधी भीती वाटली; पण नंतर आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने त्याने या प्राण्याला एका जारमध्ये ठेवून घरी आणले व पाण्याने भरलेल्या एका कंटेनरमध्ये ठेवले. त्याला एक छोटा मासा खाण्यास दिला गेला.

Back to top button