कोरोना रुग्णांना मानसिक समस्यांचा धोका अधिक | पुढारी

कोरोना रुग्णांना मानसिक समस्यांचा धोका अधिक

न्यूयॉर्क : कोरोना विषाणूचे संक्रमण हे शरीराबरोबरच मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम करत असते. आता ‘लान्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात एका संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये दीर्घकालीन मानसिक समस्यांचा धोका अधिक असतो.

डिप्रेशन, झोपेची समस्या, एंग्झायटी अशा मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आणि कोरोनाचे रुग्ण यांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. ब्रिटन, स्वीडन, डेन्मार्क, आईसलँड, एस्टोनिया आणि नॉर्वेच्या लोकांवर सोळा महिने पाहणी करण्यात आली. या संशोधनात कोरोनाच्या रुग्णांना समाविष्ट करण्यात आले होते.

तसेच ज्यांना कधीही संक्रमण झाले नाही असेही लोक होते. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांमध्ये मानसिक समस्या विकसित होण्याचा धोका अधिक असतो. संक्रमणरहीत लोकांपैकी 11.3 टक्के लोकांमध्ये डिप्रेशनची लक्षणे दिसून आली तसेच कोरोना रुग्णांपैकी 20.2 टक्के लोकांमध्ये अशी लक्षणे दिसली.

या काळात 29.4 टक्के संक्रमणरहीत लोकांची तर 23.8 टक्के कोरोना रुग्णांची झोपेची गुणवत्ता खराब झाली. कोरोना संक्रमणामुळे एक आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ बिछान्यावर झोपून राहिलेल्या लोकांमध्ये डिप्रेशन आणि एंग्झायटीचा धोका 50 ते 60 टक्क्यांनी वाढलेला दिसून आला. ज्या संक्रमित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ आली नाही त्यांच्यामधील डिप्रेशन व एंग्झायटीची लक्षणे जास्तीत जास्त दोन महिन्यांमध्येच कमी झाली.

Back to top button