डोळे उघडे ठेवूनही शार्क झोपतात! | पुढारी

डोळे उघडे ठेवूनही शार्क झोपतात!

वॉशिंग्टन :  शार्क मासे झोपतात की नाही हे गूढ अनेक वर्षांपासून उलगडलेले नव्हते. आता मात्र संशोधकांनी हे गूढ उलगडले असून शार्क मासेही झोपतात आणि कधी कधी चक्क डोळे उघडे ठेवूनही झोपतात असे नव्या संशोधनातून दिसून आले आहे.
‘बायोलॉजी लेटर्स’ नावाच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीच्या मायकल केली आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.

हे मासे आपली ऊर्जा कशी टिकवून ठेवतात याबाबतचा अभ्यास करण्यात आला. गाढ झोपेने मानव आणि अन्यही अनेक प्राण्यांमध्ये तन-मनाला विश्रांती मिळत असते व ते ताजेतवाने होत असतात. ‘ड्रॉट्सबोर्ड शार्क (सेफॅलोस्किलियम इसाबेलम) या माशांची अभ्यासासाठी निवड करण्यात आली होती. हे मासे वारंवार विश्रांतीच्या स्थितीत जातात आणि आपली ऊर्जा टिकवून ठेवतात असे दिसून आले. त्यांची ही विश्रांती ज्यावेळी पाच मिनिटांपेक्षा अधिक काळ होते त्यावेळी ती स्थिती झोपेसारखीच असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांच्या झोपेचे आम्ही पहिले-वहिले ‘फिजिऑलॉजिकल’ पुरावे मिळवलेले आहेत असे संशोधकांनी म्हटले आहे. या संशोधनामुळे शार्कच्या अन्यही प्रजातींमधील झोपेबाबतच्या संशोधनाचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो.

 

Back to top button