अमेरिकेत वाढला मातीच्या झोपडीत राहण्याचा ट्रेंड | पुढारी

अमेरिकेत वाढला मातीच्या झोपडीत राहण्याचा ट्रेंड

वॉशिंग्टन : मातीच्या भिंती आणि वर गवताचे छप्पर! भारतासह कोणत्याही आशियाई देशात हे द‍ृश्य पाहायला मिळू शकते. मात्र, अमेरिकेत सध्या अशा झोपडीत राहण्याचा कल वाढत आहे. विशेषतः मॉन्टेना किंवा अ‍ॅरिझोनासारख्या राज्यांमध्ये मातीच्या झोपडीत राहण्याचा ट्रेंड वाढला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तिथे अशा मातीच्या झोपडीची लोकप्रियता वाढली आहे. ही मोहीम 1995 मध्ये स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतील तीन विद्यार्थ्यांनी सुरू केली होती. त्यांनी ‘डान्सिंग रॅबिट’ नावाच्या इको-व्हिलेजची निर्मिती केली होती जिथे लोक स्वतःच माती व गवतापासून झोपड्या बनवून राहत असत. मात्र, कोरोना काळात लोकांनी ‘सस्टेनेबल लिव्हिंग’च्या या पद्धतीकडे अधिक लक्ष दिले. 2020 च्या सुरुवातीस सोशल मीडियात अशाच एका घराचा व्हिडीओ आल्यानंतर हा ट्रेंड अनेक पटीने वाढला.

मातीच्या झोपडीत राहण्याचा ट्रेंड

इको-व्हिलेजमध्ये 38 घरे असून ही सर्व मातीने बनवलेली आहेत. कोरोनाच्या आधी याठिकाणी दरवर्षी 40 ते 45 लोक अशी घरे बनवण्याची कला शिकण्यासाठी येत असत. आता एक हजारपेक्षाही अधिक लोक येतात. या घरांसाठी सिमेंट किंवा लोखंडाचा वापर केला जात नाही. 70 टक्के वाळू आणि 30 टक्के मातीमध्ये भुसा मिसळून त्यापासून भिंती बनवल्या जातात.

बांबूपासून छताचा सांगाडा बनवला जातो व त्यावर वाळलेले गवत आच्छादले जाते. भिंतींसाठी जी सामग्री वापरली जाते त्यापासून कौलेही बनवली जाऊ शकतात. घराच्या छतावर सोलर पॅनेल लावून वीजनिर्मिती केली जाते. ही घरे उन्हाळ्यात गारवा देतात तर थंडीत ऊबदार राहतात. पर्यावरणाला अनुकुल अशा या घरात राहण्याचा आनंद तिथे अनेक लोक घेत आहेत. अशा घरांचे आयुष्यही तुलनेने अधिक असते.

Back to top button