डुकराचे हृदय बसवलेल्या रुग्णाचा दोन महिन्यांनी मृत्यू | पुढारी

डुकराचे हृदय बसवलेल्या रुग्णाचा दोन महिन्यांनी मृत्यू

न्यूयॉर्क :  दोन महिन्यांपूर्वी जनुकीय सुधारणा केलेले डुकराचे हृदय प्रत्यारोपित केलेल्या रुग्णाचा आता मृत्यू झाला आहे. या हृदयासह हा माणूस दोन महिने जिवंत राहिला हे विशेष! 57 वर्षे वयाच्या या माणसाचे नाव डेव्हीड बेनेट सिनियर असे आहे. त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून ते शोधण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत आहेत.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटर येथील कार्डियाक ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमचे संचालक डॉ. बार्टली ग्रीफिथ यांनी सांगितले की बेनेट यांच्या मृत्यूने आम्ही व्यथित झालो आहोत. त्यांनी अखेरपर्यंत झुंज दिली आणि रुग्ण म्हणूनही त्यांनी मोठेच धैर्य दर्शवून आदर्शवत कामगिरी केली.

आपले धैर्य आणि खंबीरपणा यामुळे ते जगभरातील लाखो लोकांच्या परिचयाचे झाले व यासाठी ते कायमच स्मरणात राहतील. डॉ. बार्टली ग्रीफिथ यांनीच बेनेट यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरात डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण केले होते.

बेनेट यांना अत्यंत गंभीर हृदयविकार होता व त्यांच्यावर अखेरचा उपाय म्हणून 7 जानेवारीला ही अनोखी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मानवी शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेने सहजतेने स्वीकारावे अशा पद्धतीने जनुकीय सुधारणा केलेले डुकराचे हृदय त्यांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले होते.

Back to top button